सुभेदार विजय बेडकुते यांच्यावर वरकुटे येथे लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार

करमाळा (दि. 19 ऑगस्ट) – वरकुटे (ता. करमाळा) गावचे सुपुत्र व भारतीय सैन्य दलातील सुभेदार विजय निवृत्ती बेडकुते यांचे 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

बेडकुते यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सुभेदार बेडकुते हे गेल्या 28 वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. त्यांनी देशाच्या विविध भागात सेवा बजावली आहे. चेन्नई येथे ड्युटीवर असताना 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले, अशी माहिती मिळाली आहे.

त्यांच्या निधनाने वरकुटे गावावर शोककळा पसरली. सुभेदार बेडकुते यांच्या पार्थिवावर 18 ऑगस्ट रोजी मूळगाव वरकुटे येथे लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी लष्करी पथकाकडून बंदुकींच्या सलामीसह राष्ट्रध्वज आच्छादनाचा मान देण्यात आला. “विजय बेडकुते अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

अंत्यविधीला तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, सैनिक कल्याणकारी संघटनेचे पदाधिकारी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. ग्रामस्थ व नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुभेदार बेडकुते यांना श्रद्धांजली वाहिली.


