राजुरीच्या सुप्रिया दुरंदे यांना ‘अपराध सिद्धी पोलिस’ पुरस्काराने केले सन्मानित
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : राजुरी (ता.करमाळा ) गावच्या कन्या व पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दगडु दुरंदे(सिंजुके) यांना महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक यांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी सुप्रिया दुरंदे यांना राज्यातील ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पोलिस’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील १३ वर्षीय लहान मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता. शिराळा पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दगडु दुरंदे यांनी आरोपीस तात्काळ अटक करून कौशल्यपूर्ण तपास केला.
त्यानंतर थोड्याच दिवसात इस्लामपूर सत्र न्यायालयाने आरोपीस 20 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावून पिडीत कुटूंबियांस न्याय दिला.
या कौशल्यपूर्ण तपासाची दखल घेवून महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पोलिस’ हा पुरस्कार सुप्रिया दुरंदे यांना देण्यात आला.सदर पुरस्कार त्यांना सीआयडीचे राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेशकुमार यांच्या हस्ते देण्यात आला.
त्यांच्या या कामगिरीबद्दल राजुरी ग्रामस्थांकडून व करमाळा तालुक्यातून सुप्रिया यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.