करमाळा नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मिळालेल्या १० कोटी निधी वितरित करण्यावरील स्थगिती उठविली : आमदार संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

करमाळा नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मिळालेल्या १० कोटी निधी वितरित करण्यावरील स्थगिती उठविली : आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत करमाळा नगर परिषदेसाठी 2021- 22 या वर्षासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 19 एप्रिल 2022 रोजी च्या शासन अध्यादेशानुसार १० कोटी निधी मंजुर झालेला होता, परंतु सदर निर्णयाला नगरविकास विभागाने 6 जुलै 2022 रोजी स्थगिती दिलेली होती. सदर स्थगिती दिनांक 25 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयानुसार उठविली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आपण मार्च 2022 मध्ये करमाळा नगर परिषदेमध्ये विविध विकास कामांना राज्यस्तरीय ठोक निधी तरतुदी अंतर्गत १० कोटी रुपयांची निधीची मागणी केली होती.

सदर निधीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे व चबुतरा बांधकाम करणे यासाठी 45 लाख, करमाळा नगरपालिका प्रशासकीय इमारत बांधकाम करणे यासाठी 4 कोटी 55 लाख तसेच करमाळा नगरपालिका क्षेत्रात सांस्कृतिक भवन बांधकाम करणे यासाठी 5 कोटी असा एकूण 10 कोटी निधी मंजूर झालेला होता.

ही स्थगिती उठवण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख (शिंदे गट) महेश चिवटे यांनीही प्रयत्न केल्याचा आवर्जून उल्लेख आ. शिंदे यांनी केला. या कामामुळे शहराच्या वैभवात निश्चितच भर पडेल असा दावा ही आ. संजयमामा शिंदे यांनी केला. भविष्यकाळातही शहरांतर्गत रस्ते व बंदिस्त गटारी यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून तसे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!