फिसरे ते सौंदे अपूर्ण रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे – उद्योजक भरत आवताडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : नागरीकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व जवळचा असणारा फिसरे ते सौंदे हा चार किलोमीटरच्या रस्त्याचे राहिलेले उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी उद्योजक भरत आवताडे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांचेकडे केली आहे.
फिसरे ते सौंदे हा चार किलोमीटरचा रस्ता या भागातील हिसरे, फिसरे, हिवरे, कोळगाव, गौंडरे, निमगाव, सालसे या भागातील नागरीकांना जेऊर येथे जाण्यासाठी अत्यंत जवळचा रस्ता आहे. या रस्त्यामुळे या भागातील व गावातील नागरीक, विद्यार्थी यांना सौंदे मार्गे जेऊर रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग आहे.
हा रस्ता झालातर नागरीकांना पुणे, मुंबई या ठिकाणी जाणे सोयीस्कर होणार आहे. सध्या हा रस्ता अपूर्ण असल्याने नागरीकांना शेलगाव व करमाळा मार्गे लांबून जावे लागत आहे. त्यामुळे नागरीकांचा वेळ वाया जात असून त्रासही सहन करावा लागत आहे. सौंदे येथे जागृत देवस्थान बाळनाथाचे मंदिर असून येथे दरवर्षी चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरते. या यात्रेला जाण्यासाठी भाविकांना हा जवळचा चांगला मार्ग आहे. फिसरे पासून अवताडे वस्ती पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. तेथून पुढे मात्र सौंदे गावापर्यंत डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे या उर्वरित रस्त्याचे काम होणे अत्यंत गरजेचे असून या कामाचा आपण आ.शिंदे यांचेकडे पाठपुरावा करणार असून, तातडीने रस्ता करण्यासाठी मागणी केली आहे.





