स्वप्नातील शाळा…

सुंदर इमारत बांधण्यासाठी पाया भक्कम लागतो.त्यामध्ये जे काही मिसळायचे असते त्या साऱ्या रसायनाची भट्टी व्यवस्थित जुळावी लागते. त्यानंतरच एखादी देखणी इमारत उभी राहते.हीच गोष्ट मुलांच्या आयुष्यालाही लागू पडते.मुलं घडायची असतील तर त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया हा असाच भक्कम असायला हवा. तसा भक्कम पाया बघण्याचे भाग्य मला लाभले ते शेरे वस्ती देवळाली इथल्या प्राथमिक शाळेत..

एरवी जिल्हा परिषदेच्या शाळांना नावे ठेवण्याचा, त्यांच्या नावाने बोटे मोडण्याचा एक नवा ट्रेंड समाजात पसरला आहे.त्यामुळे पालक आपली मुले डॉन बॉस्को, ग्रीन फिंगर्स, लिटिल फ्लावर्स अशा पाश्चात्य नावाच्या शाळेत खूप सारे पैसे भरून पाठवतात. ती मुले चकचकीत स्कूल बसमधून प्रवास करतात… आकर्षक गणवेशात वावरतात. पण या साऱ्या गोष्टी म्हणजे शिक्षण नसते.मुलांचा सर्वांगीण विकास होणे,त्यांच्यामध्ये लेखन, वाचन,गणित या क्रियांचा योग्य मिलाफ होणे,त्यांच्या मानसिक विकासाबरोबरच शारीरिक विकास होणे या साऱ्या गोष्टी शिक्षणात मोडतात.. त्यामुळे शेरे वस्तीवरील पहिली ते चौथी पर्यंतचे जे वर्ग मी पाहिले त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्याची पाळी माझ्यावर आली…
तिथल्या पहिली ते चौथीच्या जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांचे 30 पर्यंतचे पाढे पाठ आहेत.. त्या सर्वच मुलांचे मराठीचे व इंग्रजीचे हस्ताक्षर मोत्यासारखे ठळक आहे. ही सारी बाब आपल्या डोळ्यांना समाधान देणारी आहे.. त्या मुलांच्या अक्षरांचे फोटो मी इथे देईनच पण पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाक्य वाचता येतात. मराठी वाक्याचे इंग्रजी भाषांतर करता येते. एकमेकांना इंग्रजीत प्रश्न विचारता येतात. हे मी स्वतः ज्यावेळेस अनुभवले त्यावेळेस मी अक्षरशः दिपून गेलो..

एक शिक्षक म्हणून मलाही हे माहित आहे की या गोष्टी सोप्या नाहीत. वर्गातील एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याने अशा प्रकारे उत्तर देणे ही फारशी काही मोठी गोष्ट नाही, पण जेव्हा अख्खा वर्ग अस्खलितपणे जर उत्तर देत असेल, ना तर ती खूप मोठी गोष्ट असते आणि ही गोष्ट साध्य केली आहे ती तिथल्या दोन शिक्षकांनी… त्यांची नावे आहेत शहाजी रंधवे सर आणि सुनील पवार सर.
आपली शाळा आणि विद्यार्थी यांच्यासाठी स्वतःला किती वाहून घ्यावं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हे दोन शिक्षक.. कोणतेही काम हे एकमेकांच्या सहकार्याशिवाय होत नाही याचा सुंदर वस्तू पाठ म्हणजे शेरे वस्तीवरील शाळा….. शाळा वस्तीवर आहे पण शाळेचा परिसर रम्य आहे.. परिसर स्वच्छ आहे. पाण्याची सोय आहे..त्यामुळे झाडांनी गजबजलेला आहे.. तिथे 70 ते 80 पक्षांची नोंद इथल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून केली, हे विशेष.. आता मुले त्या पक्षांच्या नावासहित त्यांची माहिती सुद्धा सांगू लागलेत हे मी तेथे पाहून आलोय…

बालवाडीत असणारी समृद्धी साळुंखे ही मुलगी तिकडे न बसता पहिली दुसरीच्या वर्गात बसते… तर तिचे 13 पर्यंत पाढे पाठ आहेत..ती छान लिहिते..ती न अडखळता वाचते.. मला वाटते हाच त्या दोन शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार आहे..
मी किती विद्यार्थ्यांची नावे सांगू??? आलिया शेख या चौथीच्या मुलीचे इंग्रजी व मराठीचे अक्षर पाहून आपल्याला वेड लागेल.. तनुजा चव्हाण या छोट्या मुलीचे अक्षर सुद्धा तितकेच देखणे आहे. ही अशी सुंदर अक्षरे या मुलांचे भविष्य ठरवतात.. यामध्ये विनय साळुंखे,अपेक्षा ननवरे,मानसी फरतडे, श्लोक कानगुडे, सार्थक, प्रथमेश,प्रियंका, दिव्या, इरम,प्रणव,ओंकार,असद, स्वराज,भक्ती,प्रांजली, सई,सिमरन, महेश, बाबा,अर्जुन,आकांक्षा, दिव्या, निकिता….. किती म्हणून विद्यार्थ्यांची नावे सांगावीत… या साऱ्यांची अक्षरे आपल्याला विचार करायला भाग पाडतात.. या साऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या वाचन आणि लेखन क्षमता जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत असणारे सारे गैरसमज पुसून काढतात..

या मुलांबद्दल मी अजून काय सांगू???ही मुले इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ सांगतात.. वेगवेगळे काळ ओळखतात. आणि एक वाक्य इंग्रजी मध्ये विविध काळात करून दाखवतात…या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही मुले डिग्री ची वाक्य सांगतात. नॉट ओन्ली बट अल्सो करून दाखवतात. इंग्रजीत प्रश्न विचारून त्यांची उत्तरे देतात..
इयत्ता दहावी आणि बारावीच्या मुलांना ज्या गोष्टी अवघड वाटतात त्या गोष्टी ही मुले लीलया करून दाखवतात ही सारी या शिक्षकांची किमया आहे… कोणी बघायला असो वा नसो… चैत्र महिन्यात ज्याप्रमाणे जंगल बहरते, त्याला नवीन पालवी फुटते, फुले येतात त्याप्रमाणे या शिक्षकांचे काम चालू आहे..कोणी प्रशंसा करा किंवा करू नका त्यांची कामे ते करीत राहतात…
या मुलांना वेगळे क्लास नाहीत. या मुलांना वेगळ्या ट्युशन्स नाहीत. फक्त रोज शाळेत येऊन शिक्षकांच्या भरवशावर ही मुले इतकी जबरदस्त कामगिरी करीत आहेत. या मुलांनी जिल्हा परिषद शाळेबद्दलच्या साऱ्या निगेटिव्ह संकल्पना मोडीत काढल्या आहेत, याचा मी साक्षीदार आहे…

त्यामुळेच ही मुले व ही शाळा व्हायरल व्हायलाच हवी. आपल्याला देव भेटावा म्हणून काशीपर्यंत जाणाऱ्या माणसाला देव जसा आपल्याच जवळ आपल्याच अंतकरणात आहे हे कळत नाही, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा एक इतकी चांगली शाळा,चांगले शिक्षक हाकेच्या अंतरावर आहेत हे माहित नाही.. यापेक्षा आपल्या अज्ञानाची कीव काय करावी.. म्हणूनच जाता जाता एक वाटते की या शाळेच्या गुणवत्तेचे आणि इथल्या शिक्षकांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन व्हावे….बस्स इतकेच….
शेरे वस्ती देवळाली येथील रहिवाशांनी इथली शाळा,इथली झाडे,इथले पक्षी आणि इथली सर्व मुले जपली आहेत.. ही वस्ती या शाळेसाठी तन मन धनाने समर्पित आहे ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे. म्हणूनच मी म्हणेन की शाळा कशी असावी आणि शिक्षकांनी समर्पित भावनेने कसं काम करावं हे जर बघायचं असेल तर शेरे वस्तीवरील शाळेची दारे आपल्यासाठी सदैव उघडी आहेत हे नक्की..

लेखासोबत मी या मुलांच्या सुंदर हस्ताक्षरांचे फोटो टाकतोय ते सुद्धा आपण नक्की पहावेत आणि ते पाहत असताना हे लक्षात घ्यावे की ही मुले फक्त पहिली ते चौथी या वर्गात शिकणारी आहेत. त्याचबरोबर मुख्याध्यापक श्री शहाजी रंधवे सर (मो.8390271001) यांचा सुद्धा मोबाईल क्रमांक देत आहे.. त्यांना याबाबत शाबासकीची आणि कौतुकाची थाप आपण जरूर द्यावी.. कारण चांगल्याला चांगलं म्हणायला काय हरकत आहे.
✍️भीष्मा चांदणे, करमाळा, मो. 9881174988.


