प्रमोद झिंजाडे यांनी सुरू केलेल्या विधवा सन्मान व संरक्षण अभियानाची नागपूर अधिवेशनात दखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी सुरू केलेल्या विधवा सन्मान व संरक्षण अभियानाची दखल नागपूर येथे सुरु असलेल्या विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना मांडून घेण्यात आली.
विधान परिषद सदस्य आमदार रामराव पाटील यांनी हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीबाबत मंजूर केलेला ठराव तसेच त्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने या पूर्वी हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेचा संदर्भ सादर करून विधवांचे सौभाग्य अलंकार काढून त्यांची विटंबना करणारी अनिष्ट प्रथा महाराष्ट्र शासनाने कायदा करून बंद करावी अशा आशयाचे प्रवाभी प्रतिपादन केले.
विधान परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदर लक्षवेधी सूचना स्वीकृत केली. सदर सूचना मांडण्यापूर्वी आमदार रामराव पाटील यांनी प्रमोद झिंजाडे यांच्याशी संपर्क साधून विधवा प्रथा बंदी विषयी त्यांनी सुरु केलेल्या अभियानाची सविस्तर माहिती घेतली. या लक्षवेधीच्या अनुषंगाने सभागृहामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या अधिवेशनात आमदार रामराव पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडल्याबद्दल व सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदर लक्षवेधीस स्वीकृत केल्याबद्दल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविल्याबद्दल झिंजाडे यांनी समाधान व्यक्त केले. नुकताच या अभियानाचे महत्त्व आणि गांभीर्य विचारात घेऊन महाराष्ट्र फाऊंडेशनने श्री झिंजाडे यांना विशेष पुरस्कार घोषित केला आहे.