कार-मोटारसायकल अपघातात जातेगाव येथील युवकाचे निधन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा – अहमदनगर रोडवरील जातेगाव जवळ कार व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी ठार झाला आहे. हा अपघात १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
या प्रकरणी सुरेश भानुदास ससाणे यांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मी भैरवनाथ मंदिरात असताना आमच्या गावातील दत्तात्रय एकनाथ शिंदे यांनी मला फोनद्वारे कळविले की करमाळा-अहमदनगर रोडवरील जयभवानी हॉटेल समोर तुमचा मुलगा नितीन ससाणे याचा अपघात झाला आहे.
त्यावेळी मी तातडीने त्या ठिकाणी गेलो असता, त्या ठिकाणी मुलगा गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. माझा मुलगा नितीन सुरेश ससाणे ( वय – ३५) हा दररोज मोटारसायकल क्र. एमएच ४५ व्ही ४९६४ ने वीट (ता.करमाळा) येथे खाजगी कंपनीमध्ये स्टोअर कीपर म्हणून काम करण्यासाठी जात असतो. १६ नोव्हेंबर रोजी कामासाठी जात असताना जातेगावहून करमाळ्याकडे जाताना करमाळ्याहून अहमदनगरकडे जाणारी गाडी क्र. एमएच १३ डीई ६३२८ या वाहन चालकाने माझा मुलगा नितीन यास समोरून जोराची धडक दिली. त्यात माझ्या मुलाचा उजवा पाय तुटलेला आहे. तसेच डोक्यावर व शरीरावर गंभीर दुखापत होऊन रक्त येत होते.
मुलगा नितीन बेशुध्द अवस्थेत पडलेला होता. त्यानंतर तातडीने मी माझा दुसरा मुलगा अमोल ससाणे व गावातील लोकांनी खाजगी वाहनातून उपचाराकरीता उपजिल्हा रूग्णालय करमाळा येथे आणले. त्यावेळी प्राथमिक उपचार करून वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे जाण्यास सांगितले. परंतू नितीन हा गंभीर जखमी असल्याने त्यास अहमदनगर येथील साईदिप हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले. परंतू उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. या प्रकरणी करमाळा पोलीसांनी वाहनचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
अपघातात मृत नितीन ससाणेच्या नातेवाईकांनी करमाळा उपजिल्हा रूग्णालयासमोर उभा राहून मृतदेह ताब्यात न घेता संबंधित चारचाकी वाहनावर कडक कारवाई करावी व मृतांच्या वारसांना तात्काळ मदत द्यावी, यासाठी मोठा आक्रोश करत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जगताप यांच्या समजुतीने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन जातेगावला नेण्यात आले.