प्राप्त परिस्थितीला अनुसरून योग्य तो राजकीय निर्णय घेवू – विलासराव घुमरे
करमाळा / संदेश प्रतिनिधी : सध्या आपण पुर्णत: शैक्षणिक उपक्रमावर लक्ष देत असून, त्यात विकासात्मक कामे करण्यासाठी प्रयत्नशील आहे. राजकारणाबाबत ज्यावेळी निवडणूका जाहीर होतील, त्यावेळच्या प्राप्त परिस्थितीला अनुसरून आपण योग्य तो राजकिय निर्णय घेऊ व कोणासोबत जायचे हे ठरवू; असे प्रतिपादन विद्या विकास मंडळाचे सचिव व करमाळा तालुक्यातील किंगमेकर म्हणून ज्यांची ओळख आहे, असे विलासराव घुमरे यांनी व्यक्त केले.
श्री.घुमरे यांचा ६९ वा वाढदिवस येत्या ६ फेब्रुवारीला होत आहे. त्यानिमित्ताने ते ‘साप्ताहिक कमलाभवानी संदेश’शी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की राजकारणात सध्या मी सर्वांच्याच समान अंतरावर आहे. जिथे जिथे विकासात्मक कामे होतात, तिथे तिथे मी कायम असतो. राजकारणाचा विषय घेऊन मी सध्या कोणाबरोबरच नाही. ज्यावेळी निवडणुकांचे पडघम वाजतील त्यावेळी प्राप्त परिस्थिती पाहून कोणाबरोबर काम करायचे; हे ठरवणार आहे.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी प्रयत्न करत आहे. आमचा यशवंत परिवार, विलासराव घुमरे पतसंस्था, दिगंबरराव बागल पेट्रोलपंप यावर माझे लक्ष केंद्रीत आहे. लवकरच आमच्या जवळच्या प्रतिनिधी मार्फत मकेपासून ग्लुकोज बनवण्याची फॅक्टरी टाकण्याचा मानस आहे. तालुक्यातील कमी पाण्याच्या शेतकऱ्यांना मका उत्पादीत करण्यास लावून त्यांना चांगला भाव मिळावा व बेरोजगार युवकांना काम मिळावे हा उद्देश ठेवून हा उद्योग उभारण्याचे धोरण आहे. ….विलासराव घुमरे (सचिव, विद्या विकास मंडळ, करमाळा.)
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे (सर) यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त ६ फेब्रुवारी रोजी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या क्रिडागंणावर आयोजित केला आहे. शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहावे असे अवाहन करण्यात आले आहे. यावेळी ठिबक्याची रांगोळी या मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर तथा अप्पू या उपस्थित राहणार आहेत. तसेच आर. जे. अक्षय प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांसाठी रंजक खेळ, मराठी – हिंदी गाण्यांचा कॉमेडी तडका तसेच शेकडो आकर्षक बक्षीसे, पैठणी साडीचा खेळ यात विजयी होणाऱ्या महिलांसाठी प्रथम बक्षीस एल.ई.डी. टीव्ही, व्दितीय बक्षीस वॉशींग मशीन, तृतीय बक्षीस मिनी आटा चक्की तसेच उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत.