घरतवाडीतील ग्रामस्थांनी मतदानावर टाकला बहिष्कार – येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार ठाम – ग्रामस्थांची डांबरी रस्त्याची मागणी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : “घरतवाडी विकणे आहे”, “शासकीय यंत्रणेवर बहिष्कार”, भारत स्वतंत्र होवून ७५ वर्षे पूर्ण झाली तरी, घरतवाडी गावाला डांबरी रोड नाही..!” “कधी मिळणार आमच्या हक्काचा डांबरी रस्ता”, “निष्क्रिय शासन यंत्रणा आणि ढिम्म प्रतिनिधी” “आमच्या हक्काचा रस्ता मिळालाच पाहिजे..!” अशा प्रकारचे पोस्टर करून घरतवाडी ग्रामस्थांनी यापूर्वी सर्व निवडणुकांवर आपण बहिष्कार घालणार आहोत, असे सांगितले होते, त्याप्रमाणे आज (ता.18) येथील ग्रामस्थांनी निवडणुक यंत्रणेवर बहिष्कार घालून कोणीही मतदान न करता बहिष्कार यशस्वी केला आहे.
डांबरी रस्त्याच्या विकासाकरिता घरतवाडीतील नागरिकांनी बहिष्कार पुकारलेला होता, जोपर्यंत डांबरी रस्ता होणार नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही, त्यानुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये घरतवाडीतील नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी वरील मतदान प्रक्रियेत सहभागी न होता दोष व्यक्त केला आहे अशा प्रकारे भविष्यातील येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार ठाम राहील प्रशासनाने आता तरी डांबरी रस्त्याची दखल घेऊन डांबरी रस्ता विकसित करावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.
गावाला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा डांबरी रस्ता नाहीये त्यामुळे येथील नागरिकांची वाटचाल अत्यंत खडतर प्रवासातून होत आहे, या भागातील वृद्ध नागरिक, शाळकरी विद्यार्थी, दुचाकी, चारचाकी वाहनचालक यांना या वाहतुकीचा प्रचंड मोठा सामना करत प्रवास करावा लागत आहे.