विठ्ठल-रूक्मीणीचे सेवेकरी बंडोपंत काका काळाच्या पडद्याआड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : किल्लाविभाग येथील रहिवाशी व श्री विठ्ठल-रुक्मीणी मंदिराचे मालक बंडोपंत कुलकर्णी (वय-८५) यांचे आज (ता. १६) सकाळी पावणेनऊ वाजता निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे.
बंडोपंत हे धार्मिक वृत्तीचे होते. डोक्यावर टोपी, अंगात तीन गुंड्याचा पांढरा शर्ट व धोतर, कपाळावर विठ्ठलाचा टिळा असा त्यांचा कायमचा पेहराव होता. त्यांनी हयातीपर्यंत विठ्ठल-रुक्मीणीची सेवा केली. सकाळी लवकर उठून ते नियमितपणे विठ्ठल-रुक्मीणीची पुजा करून पुढील कामासाठी कार्यरत रहात होते.
त्यांना पेटी वाजविणे, गायन यामध्ये मोठी रूची होती. लग्नसमारंभात त्यांची हजेरी असली की, त्यांच्या मुखातून मंगलाष्टीकेचा स्वर निघाल्याशिवाय रहात नव्हता. एकादशीला विठ्ठल मंदिरात भजन, गीतगायनचा कार्यक्रम, दरवर्षी महिन्याभर मंदिरात पहाटे पासून चालत असलेला काकडा, गोकुळ आष्टमीनिमित्त हरिनाम सप्ताह, आषाढी एकादशीला दिंड्यांची भोजनाची तसेच मंदिरात वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करणे, गरीब गरजूंना मदतीचा हात पुढे करणे अशा विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमात ते नेहमी अग्रेसर असत.
करमाळा भूषण गिरधरदास देवी यांचे ते कट्टर समर्थक होते. गेली दोन वर्षे ते आजाराने त्रस्त होते. आज १६ जानेवारीला सकाळी पावणेनऊ वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाबद्दल ब्रह्मवृंद संस्था तसेच किल्ला विभाग परिसरातील नागरीकांनी दुःख व्यक्त केले.