कुकडी ओहोरफ्लोचे पाणी कामोणे तलावात दाखल – ग्रामस्थांकडून पाणी पूजन
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कुकडीतील ओहोरफ्लोचे पाणी मिळावे, यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर कामोणे (ता.करमाळा) येथील तलावात पाणी आले आहे, त्यामुळे कामोणे गावातील नागरिकांनी पाणी पूजन करून संतोष वारे यांचे आभार व्यक्त केले.
कामोणे येथील तलावात कुकडीचे ओहोरफ्लोचे पाणी आले असून, या पाण्याचे पूजन गावातील जेष्ठ नागरिक अर्जुन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कुकडीतील ओहोरफ्लोचे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
राज्यातील अनेक धरणे भरत आली आहेत. मात्र अद्याप करमाळा तालुक्यातील अनेक तलाव कोरडे आहेत. निम्मा पावसाळा संपत आला आहे त्यामुळे ओहोरफ्लोच्या पाण्याने करमाळा तालुक्यातील कुकडी धरण लाभक्षेत्रात येणारे तलाव भरून घेण्यात यावेत, अशी मागणी करत श्री. वारे यांनी अहमदनगर- सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कामोणे येथे पाणी आले आहे. संतोष वारे यांच्या या प्रयत्नाने हे यश आले आहे, असे मत राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे पाटील यांनी व्यक्त केले.
कामोणे येथे तलावात पाणी पूजन करताना उपसरपंच संदीप नलवडे, सोमनाथ भिसे, मधुकर जाधव, चिंटू भालेराव, औदुंबर नलवडे, अजय पवार, लक्ष्मण भालेराव, दीपक देवकते, कृष्णा भिसे, चंद्रकांत पवार, गणेश वाल्मिक शिंदे, सौरभ देमुंडे, पांडुरंग नलवडे, अशोक देवकते, तुळशीराम देमुंडे आदी यावेळी उपस्थित होते.