जेऊरच्या भूयारी मार्गावर पाणीच पाणी – वाहनांची मोठी कसरत
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील मेनरोडवरील रेल्वेट्रॅकच्या खालील भुयारी मार्गावर आज (ता.४) दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साठून सगळा भुयारी मार्ग जलमय झाला होता. या मार्गावरून चारचाकी वाहनांनाही मोठी कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत, पावसाळ्यात या मार्गावर अशाच प्रकारचे पाणी साचत आहे, मोटारसायकल व पादचारी या मार्गावरून जाताना खूप खोल पाण्यातून जावे लागत आहे, त्यामुळे सबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी वाहनचालक व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पावसामुळे पाणी साठल्यावर वाहतूकीसाठी अडचण निर्माण होते, वाहन चालकांना वाहने कशी चालवावी हा प्रश्न निर्माण होत आहे, या भूयारीमार्गाच्या मध्यभागी चारचाकी वाहनांची निम्मी चाके पाण्याखाली जात आहेत. त्यामुळे वाहन चालक या मार्गावरून जाण्यास धाडस करत नाही, त्या वाहन चालकांना पुन्हा बायपास वरुन गावात यावे लागते त्यामुळे हा जवळचा भूयारी मार्ग असताना या भूयारी मार्गाची अवस्था अशी असल्याने याबाबत लोकप्रतिनिधी व सबंधित विभागाने याकडे पाहणे गरजेचे आहे.