करमाळा तालुक्यातील रिटेवाडी योजनेसह सर्व महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Saptahik Sandesh

करमाळा तालुक्यातील रिटेवाडी योजनेसह सर्व महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा (ता.25) : करमाळा तालुक्यातील रिटेवाडी योजनेसह सर्व महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावू , तसेच आदिनाथ कारखान्यासाठी जसे तुम्ही एकत्र आले आहात, तसे तुम्ही भविष्यातही एकत्र रहा तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिनाथ कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी दिले. 

याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, आमदार राम शिंदे, आमदार रणजितसिन्ह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाच्या नेत्या आदिनाथ कारखान्याच्या संचालिका रश्मी बागल-कोलते, आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे, उपाध्यक्ष रमेश कांबळे, मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक एच.बी.डांगे, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण सावंत, माजी आमदार नारायण पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, बिभीषण आवटे, तानाजी झोळ, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले,माजी सभापती शेखर गाडे, गहिनीनाथ ननवरे, अतुल पाटील, अजित तळेकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख देवानंद बागल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, निखिल चांदगुडे, माऊली हाळनोर, जगदीश आगरवाल, समाधान दास, अमोल गायकवाड, अतुल फरतडे, अक्षय ढवळे, डॉ.हरिदास केवारे, आदिनाथचे माजी अध्यक्ष संतोष पाटील, रामदास झोळ, दत्ता जाधव, केरु गव्हाणे, उदयसिन्ह मोरे-पाटील, अतुल खूपसे-पाटील, आदिनाथ कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक उपस्थित होते. 

याप्रसंगी पुढे बोलताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हटले कि, आदिनाथ कारखाना सुरु करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी संपूर्ण माहिती सांगितली होती, त्यानुसार हा कारखाना सुरू करण्यासाठी आपण मदत करू असे त्यांना सांगितले,  त्यानंतर तानाजी सावंत यांनी कारखाना सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या, त्यानुसार कारखाना इकडेतिकडे न जाता सभासदांच्या मालकीचा राहिला, पाटील-बागल जसे कारखान्यासाठी एकत्र आले तसे भविष्यातही एकत्र रहा तुम्हाला सर्वतोपरि सहकार्य केले जाईल. उपस्थित शेतकऱ्यांनी लाईट बिलाचे बोला असे म्हटल्यानंतर श्री.शिंदे यांनी त्यावर कनेक्शन कट करायचे बंद केले आहे, तेवढे चालू बिल भरा असे आवाहन शेतकऱ्यांना केले. यावेळी नारायण पाटील यांच्या गटाच्या २१ ग्रामपंचायतिच्या सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमची सर्व कामे केली जातील असे सांगितले. 

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना चे महेश चिवटे, भाजपचे गणेश चिवटे व जगदीश आगरवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व माजी आमदार नारायण पाटील यांनी विविध मागण्याचे निवेदन देवून आपल्या भाषणादरम्यान करमाळा तालुक्यातील विविध प्रश्न मांडले. 

याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी केले. या कार्यक्रमात माजी आमदार नारायण पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच देवानंद बागल, रमेश कांबळे, केरु गव्हाणे, सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांची भाषणे झाली.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी धनंजय डोंगरे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर व ऐश्वर्या हिबारे यांनी केले. 

कार्यक्रमाचे ठळक मुद्दे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमासाठी येण्यास तब्बल २ तास उशीर झाल्याने उपस्थित नागरिकांमध्ये संताप दिसून आला..- उपस्थितांना तहान लागल्याने सर्वांनी एकच गोंधळ निर्माण केला..- पोलिसांनी सर्वांना शिट्टी मारून खाली बसविण्यात आले… – रश्मी बागल यांनी पाण्याची सोय केली जाईल सर्वांनी सहकार्य करा असे सांगितले. त्यानंतर काहीजण पाण्याची वाट पाहत बसले..- याप्रसंगी पाण्यासाठी गोंधळ झाल्यानंतर प्रा.शिवाजीराव सावंत यांनी माईक घेवून उपस्थित नागरिकांना शांत बसा, सगळ्यांना लवकरच पाण्याचे खोके वाटप केले जातील, असे सांगितलेनंतर एकच हशा पिकला…- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हॅलिकॉप्टरचे आगमन ३ वाजून १२ मिनिटांनी झाले.. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हॅलिकॉप्टरचे आगमन झाल्यानंतर निघून चाललेले काही शेतकरी पुन्हा मंडपात येवून बसले.. – अनेक कार्यकर्ते, महिला यांना आपले निवेदन मुख्यमंत्री यांना द्यायचे होते, परंतु सुरक्षा यंत्रणामुळे निवेदन देता आले नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!