वडशिवणे ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाकडे केलेली मागणी चुकीची – माजी सरपंच रत्नाकर कदम
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : वडशिवणे ग्रामपंचायतीने २ नोव्हेंबर रोजी झालेल्या मासिक बैठकीत ठराव क्र.६ अन्वये वडशिवणे तलावाच्या भरावावर जी जनावरे चरण्यासाठी येतात, त्यांच्यामुळे तलावाच्या भरावाला धोका निर्माण झालेला असल्याने पाटबंधारे विभागाने या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात ही जनावरे या भरावाकडे जात नसून एखादी दुसरी कधी गेली असेल तर त्यांच्यामुळे तलावाला कोणतीही हानी पोहोचलेली नाही. गावाच्या आश्रयास राहणाऱ्या गवळी लोकांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने ही मागणी करण्यात येत आहे, असा आरोप वडशिवणे गावचे माजी सरपंच रत्नाकर कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, या आधी तलावाचा गाळ काढण्यासाठी, भरावावरील झाडे काढण्यासाठी पोकलेन मशीन येऊन गेल्या तरी भरावाला काही झाले नाही परंतु आता सदर गाई भरावावर गेल्यामुळे भराव फुटण्याची शक्यता सांगितली जात आहे ही खरोखरच हास्यास्पद गोष्ट आहे.
ग्रामपंचायतीने या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा वडशिवणे तलावामध्ये उजनीचे पाणी कायमस्वरूपी कसे आणता येईल त्याकडे लक्ष द्यावे.
तसेच गावातील अवैध धंदे, जुगार, मटका, शिक्षणाची गैरसोय गावातील अतिक्रमणे याकडे लक्ष दिले तर खरोखरच गावाचा विकास होईल.
प्रत्यक्षात या गाई सांभाळनाऱ्या लोकांनी गाईंना पाणी पिण्यासाठी स्वतः चे बोअर घेतले असल्याने गाई तलावाकडे जाण्याचा प्रश्न येत नाही. या गाईंमुळे वडशिवणे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला लागणारे शेणखत, गोमूत्र जागेवर विकत मिळत आहे. त्याचप्रमाणे बिगर भेसळीचे कोरे दूध मिळत आहे. त्यामुळे या गाई सांभाळण्याऱ्या लोकांना ग्रामपंचायतीकडूनच प्रोत्साहन दिले पाहिजे ना की त्यांना अडचणीत आणले पाहिजे.
संबधीत बातमी : वडशिवणे तलावावर येणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करावा : सरपंच जगदाळे यांची मागणी..