करमाळा तालुक्यातील खेडी स्मार्ट कधी होणार?
मागे स्मार्ट सीटी बरोबरच ‘स्मार्ट व्हीलेज’चा मोठा बोलबाला झाला. अपवाद वगळता त्या चर्चेतून फारसे साध्य झाले असे वाटत नाही. वास्तविक पाहता खेडी व शहर यात गेल्या अनेक वर्षापासून मोठे अंतर राहिले आहे. जसे गरीब-श्रीमंत इतके खेडी वर्षानुवर्षे गरीबच राहिली आहेत आणि शहरं श्रीमंत अधिक श्रीमंत बनत चालली आहेत. उत्पन्नापासून ते सर्व सुविधेपर्यंत.
शहरात वीज, पाणी, रस्ते, गटारी, स्वच्छतागृहे, सर्व काही पुरेपूर आणि खेड्यात प्यायला पाणी नाही. शहरात वरच्या मजल्यावर पाणी आले नाही, थोडावेळ वीज गेली तर गहजब होतो पण खेड्यात दोन दोन मैलावरून दोन-दोन हांडे डोक्यावर घेऊन महिलांना पाणी आणावे लागत आहे. विशेष म्हणजे खेड्यात जलशुध्दीकरण नावाची भानगड नसते हे विसरून चालणार नाही. वीजेचा तर भरवसाच नसतो. खरंतर वीज, रस्त्यावरील दिवे, रस्ता आणि गटारी या खेड्यात चैन भासू लागल्या आहेत. त्यानुसारच त्याची उपलब्धता दिसून येते. शौचालये गावात आणि रहिवास शेतात अशी स्थिती खेड्यांची आहे. हागणदारीमुक्त झालेल्या गावाचा आढावा घेतलातर दिसेल. गावात शौचालय बांधलेले आहे पण सोयीसाठी सर्वजण शेतात रहातात. शेतात होल वावर इज आवर, तिथे कोठले शौचालय…? अलीकडे गावापेक्षा वस्त्या मोठ्या झाल्या आहेत. त्या वस्त्यांना ना वीज, ना पाणी, ना गटारी, ना रस्ता, ना शाळा सर्वच काही अजब काम आहे. काम जिकीरीचे आहे. त्यामुळे शासनाचे तिकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ज्याच्या हाती ग्रामपंचायतीची सत्ता त्यांनी याबाबी परिपुर्ण करण्यासाठी खुप मोठे परिश्रम घेण्याची गरज आहे. या तालुक्यात सध्या जवळपास १०८ ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.
त्याला पुरेसे ग्रामसेवक नाहीत. एका ग्रामसेवकाकडे दोन-तीन ग्रामपंचायतीचा कार्यभार आहे. याशिवाय ग्रामपंचायतीचा कारभारही मोठा गंमतशीर आहे. वांगी नं.१, वांगी नं.२ यांचा उजनीच्या पाण्याने कोठेच मेळ लागत नाही. अनेक ग्रुप ग्रामपंचायतीचा मेळ लागत नाही. पोथरे -निलज, चिखलठाण नं. १ व चिखलठाण नं.२, सांगवी नं.१ व सांगवी नं. २, कुंभारगाव – घरतवाडी अशा ग्रुप ग्रामंपचायती आहेत. तेथे वस्तीवर राहणारे ग्रामस्थ ग्रामसेवकाला कसे भेटणार? शासकीय योजना कशा राबवणार ? सर्वांना समान न्याय कसा देणार ?, पिण्याचे पाणी, रस्ते, दिवे, गटारी मिळणारे अनुदान आणि गावांचा मोठा पसारा कसा मेळ लागणार..? साधरणत: ५०० मतदान असलेल्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार आळसुंदे, हिवरवाडी, भिवरवाडी, ढोकरी, गोयेगाव, जेऊरवाडी, रामवाडी, रिटेवाडी, रोशेवाडी, तरटगाव अशा छोट्या गावांना स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत. पण पोथरे-निलज, म्हसेवाडी- अर्जुननगर, देवळाली-खडकेवाडी, सोगाव (पुर्व) – सोगाव (प.), वडगाव (द ) – वडगाव (उ), विहाळ -नाळे वस्ती, कोर्टी-कुस्करवाडी-गोरेवाडी-हुलगेवाडी,
रावगाव-शेळकेवस्ती- वाघमारेवस्ती-धगटवस्ती, करंजे-भालेवाडी, कुंभारगाव- घरतवाडी, केत्तूर नं. १ – केत्तूर नं. २, वंजारवाडी – कुरणवस्ती, गुलमरवाडी-भगतवाडी, लिंबेवाडी-राखवाडी अशा ग्रुप ग्रामपंचायती आहेत. यामध्ये दोन तोटे आहेत. एक म्हणजे जे गाव मोठे असते त्यांचे सदस्य जास्त असतात. ते छोट्या गावाच्या सदस्याकडे व गावाकडे लक्ष देत नाहीत. जोडलेल्या गावाच्या विकासासाठी मोठे गाव प्रयत्न करत नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे छोटी गावे अन्याय सहन करत आलेली आहेत. दुसऱ्या बाजुला शासनाच्या योजनासुध्दा या गावात पोहोचू दिल्या जात नाहीत तसेच अधिकारीही छोट्या गावात जात नाहीत.
सोगाव पुर्व व पश्चिम यांचा भौगोलीकदृष्ट्या मेळ लागत नाही. तिच वडगाव दक्षिण व उत्तर यांचा मेळ लागत नाही, तीच स्थिती सांगवी नं. १ व २ या गावांवर वर्षानुवर्षे अन्याय झालेला आहे व छोटी गावे हे सहन करत आहेत. बिटरगाव येथील पाटीलवस्ती ही वांगीत घुसडली आहे. त्यांचा ना गावाशी संपर्क ना वांगीशी संपर्क. असेच प्रश्न लोंबकळत पडलेले आहेत. ही छोटी गावे स्मार्ट व्हिलेज च्या वाटेवरतरी चालतील की नाही, हा खरा प्रश्न आहे. खेड्यातील प्रश्न वेगवेगळे आहेत. उजनी भागात दोन गावांना जोडण्यासाठी लाँच सेवेची गरज आहे. गावा-गावांना जोडणारे रस्त्याची आवश्यकता आहे. या भागात जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला पाहिजे, गावांसाठी असलेली सिंगलफेज वीज वाड्यावस्त्यावर २४ तास दिली पाहिजे. पुर्व भागात बांधावरचे वाद, शेतात पाईप लाईन नेण्यसाठी होत असलेले वाद, पिण्याचे पाणी नसणे, गाव ते वस्ती रस्ता नसणे ? असे अनेक प्रश्न आहेत. वास्तविक पाहता वाड्यावस्त्यांना सुविधाच नाहीत. त्या सुविधा देण्यासाठी नुतन पदाधिकारी व सदस्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
वास्तविक पाहता कृषीप्रधान देश म्हणून सांगताना शेतकऱ्यांनाच सुविधा दिल्या जात नाहीत, म्हणून आपली प्रगती नाही. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात वाहन पोहचेल असा रस्ता शासनाच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने दिल्यास दूध व्यवसाय, कुकटपालन, शेळी-मेंढीपालन, भाजीपाला, रेशीम उत्पादन, घोंगडी उत्पादन हे व्यवसाय जोरात सुरू होतील. शेतकरी सक्षम उभा राहिल, पर्यायाने ग्रामपंचायती सक्षम होतील. पण अलीकडे सर्वात जास्त वाद रस्त्याचे व पाईप लाईन आडवण्याचे आहेत. त्यामुळे नुतन पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थां मधील मतभेद दुर करण्याचे काम करावे लागेल. जेंव्हा गावाचा एक विचार होईल तेंव्हाच गावाची थोडीफार प्रगती होवू शकेल; हे विसरून चालणार नाही.
✍️डॉ.अॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, जि. सोलापूर मो.९४२३३३७४८०