केम सबस्टेशनसाठीची नवीन लाईन दोन वर्षांपासून प्रलंबित – सरपंचाचा आंदोलनाचा इशारा

केम(संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथे मंजूर झालेली ३३/११ केव्ही सबस्टेशनसाठीची नवीन लाईन अद्याप जोडण्यात आलेली नाही. सदर कामात होत असलेल्या विलंबाविरोधात ग्रामपंचायत सरपंच सौ. सारिका कोरे यांनी २४ जूनपासून जेऊर येथील वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

सरपंच कोरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की, केम येथे ३३/११ केव्ही साठी २२० केव्ही जेऊर सबस्टेशन येथून स्वतंत्रपणे नवीन लाईन (३१ केव्ही) तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर असून, हे काम आरडीएसएस (सुधारित वितरण प्रणाली) योजनेअंतर्गत सन २०२३ मध्येच निविदा प्रक्रियेनंतर मंजूर करण्यात आले होते. या कामासाठी ग्रामसभेचा ठराव घेतला गेला असून एजन्सीची नियुक्ती देखील झाली आहे.

मात्र दोन वर्षे उलटूनही प्रत्यक्ष कामाची सुरुवात न झाल्यामुळे ग्रामस्थांत प्रचंड नाराजी आहे. यासंदर्भातील निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, तसेच वीज वितरण कार्यालय बार्शी यांना पाठवण्यात आल्या आहेत. उपोषणाच्या सर्व जबाबदारीची धुरा संबंधित खात्यावर राहील, असा इशाराही सरपंचांनी दिला आहे.




