नवभारत इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

करमाळा (दि. 23) –. श्री. गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मिडियम स्कूल आणि वेताळ पेठ शाखेमध्ये दिनांक २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ सालासाठी “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” ही थीम घोषित केली असून त्याच प्रेरणेतून शाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर संगीत विद्यालयाचे अध्यक्ष श्री. नरारे सर होते. त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून देत त्यांच्याकडून सुरेख योगासने करून घेतली. ते बोलताना म्हणाले, “योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून तो वर्षभर सातत्याने करणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी सूर्यनमस्कार हे अत्यंत प्रभावी साधन आहे.” त्यांच्या ऊर्जा आणि मार्गदर्शनामुळे मुलेही आनंदाने योगाभ्यासात सहभागी झाली.
या प्रसंगी शाळेच्या प्रमुख सौ. सुनीता देवी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योगाचे मानसिक आणि शारीरिक लाभ समजावून सांगितले. मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर मॅडम यांच्या हस्ते श्री. नरारे सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघाली शेटे मॅडम यांनी केले.
योग दिन साजरा करताना संपूर्ण शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन आरोग्यदायी वातावरण निर्माण केले.