मांजरगावचे सुंदरदास मोरे यांचे निधन.. शेतातच रक्षा विसर्जन- स्मृतीवृक्षाचे रोपण..

करमाळा : मांजरगाव (ता.करमाळा) येथील सुंदरदास देवराव मोरे वय (६७ ) यांचे नुकतेच 23 जून रोजी हृदयविकाराने निधन झाले. रामसुंदर शॉपिंग सेंटरचे मालक रामहरी मोरे यांचे ते वडिल होते. अत्यंत शांत,संयमी व मनमिळावू स्वभावाचे सुंदरदास मोरे यांच्या निधनाने मोरे परिवारावर दुःखाचा मोठा आघात झाला असून मांजरगाव आणि परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुंदरदास मोरे यांच्यावर 23 जून रोजी सायंकाळी सात वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थितीत होता तर बुधवार दि. २५ जून रोजी सकाळी सात वाजता सावडण्याच्या विधीच्या वेळी त्यांच्या शेतजमीनीतच रक्षा विसर्जन करून त्याजागी स्मृतीवृक्षाचे रोपण करण्यात आले. सुंदरदास मोरे यांचे धाकटे बंधू मांजरगावचे माजी सरपंच कल्याण मोरे, जगत्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रभाकर मोरे, माजी सरपंच बाळासाहेब मोरे या मोरे परिवारातील पुरोगामी विचार सरणीच्या कुटुबियांनी वृक्षारोपन करून या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श समाजासमोर ठेवला.





