१२ मोटारसायकलींसह चोरट्यांच्या टोळीचा छडा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

करमाळा, दि. २७ जून : करमाळा पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. पोलीस ठाण्याच्या विस्तृत हद्दीमुळे आणि सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये—अहिल्यानगर, धाराशिव, पुणे—संपर्क सुलभ असल्याने चोरट्यांना पळून जाणे सोपे होत होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी करमाळा परिसरात चोरीचे सत्र सुरू ठेवले होते.

पोलिसांनी या चोरींचा तपास घेण्यासाठी विशेष पथके तयार केली होती. अखेर २५ जून रोजी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन आरोपींच्या अटकेसह तब्बल १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून ७,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटना क्रमांक ०१ : ११ मोटरसायकल चोरणाऱ्या चोराचा पर्दाफाश
गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की निलेश भास्कर कदम (वय २६, रा. घाटणे, ता. माढा) करमाळा परिसरात मोटारसायकल चोरी करत आहे. या माहितीनुसार पोलिसांनी ऑलआउट कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले. दरम्यान तो संशयित इसम पोलिसांच्या तावडीत सापडला. तपासात त्याच्याकडील हिरो होंडा स्प्लेंडर गाडी ही गु.र. नं. 502/2025, भा.दं.वि. ३०३(२) अंतर्गत अंजनडोह येथून चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले.
सखोल चौकशीत त्याने करमाळा, देवीचा माळ, जेऊर, कंदर, वडशिवणे, तसेच टेंभुर्णी (सोलापूर) व परांडा (धाराशिव) परिसरातून ११ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

घटना क्रमांक ०२ :
याच दिवशी दुसऱ्या घटनेत पोलिसांना सालसे-कुर्डुवाडी रोडवर भरधाव वेगाने जात असलेल्या इसमावर संशय आला. पाठलाग करून पोलिसांनी त्याला अडवले असता त्याने आपले नाव पृथ्वीराज ऊर्फ गोट्या कांतीलाल काळे (वय २७, रा. नेर्ले, ता. करमाळा) असे सांगितले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने नंतर नेर्ले येथून स्प्लेंडर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान करमाळा पोलीस ठाण्यातील ६, टेंभुर्णीतील १, परांडा पोलीस ठाण्यातील १ आणि ४ विना एफआयआर गाड्या असे एकूण १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. यातून ७.२० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
४ मोटारसायकल बाबत माहिती अद्याप मिळालेली नसून ती मिळवण्यासाठी अकलूज व सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यामुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
पोलीस निरीक्षक रणजित माने, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सपोफी विश्वास शिनगारे, पोहेकॉ. अजित उबाळे, आप्पासाहेब लोहार, डोंगरे, मनिष पवार, मयुर गव्हाणे, राहुल भराटे, अर्जुन गोसावी, स्वप्नील शेरखाने, रविराज गटकुळ, अमोल रंदिल, योगेश येवले, मिलिंद दहिहांडे, गणेश खोटे तसेच सायबर शाखेचे पोहेकॉ. व्यंकटेश मोरे यांचे या कारवाईत मोलाचे योगदान लाभले.



