पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांना ‘बालगंधर्व’ परिवारातर्फे ‘युवा पार्श्वगायक’ पुरस्कार प्रदान

करमाळा (दि. २८): करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र आणि ‘म्युझिक कलर्स’ या आर्केस्ट्रा संस्थेचे संचालक प्रवीणकुमार अवचर यांना बालगंधर्व रंगमंदिर परिवारातर्फे “युवा पार्श्वगायक” पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातील सुप्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिराच्या ५७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

२४ जूनपासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाची सांगता २६ जून रोजी झाली. या उत्सवात विविध क्षेत्रांतील नामवंत कलाकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व चित्रपट सृष्टीतील व्यक्तींना गौरविण्यात आले. याच सोहळ्यात प्रवीणकुमार अवचर यांना त्यांच्या संगीत व सामाजिक योगदानाबद्दल हा सन्मान मिळाला.

प्रवीणकुमार अवचर गेली ३० वर्षे भारतीय संगीत व फिल्म आर्केस्ट्रा क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक दिग्गज पार्श्वगायक, गायिका आणि चित्रपट कलाकारांसोबत देश-विदेशात हजारो कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांचे गायन शिक्षण घरातूनच सुरु झाले – वडील जनार्धन अवचर, आई सत्यभामा अवचर, भाऊ राजेंद्र व मार्गदर्शक कै. सुहासकुमार अवचर यांच्याकडून त्यांनी प्राथमिक प्रेरणा घेतली.

१७व्या वर्षी करमाळा येथील बँडमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे अहिल्यानगर येथील ‘संगम मेलोडीज’मध्ये कै. जोसेफ वाघमारे व संजय आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फिल्मी गीते शिकली. २००० साली पुण्यातील सुप्रसिद्ध ‘मेलोडी मेकर्स’ आर्केस्ट्रामधून त्यांना गायनाची संधी मिळाली. त्या पुढे ‘म्युझिक इंडिया’, ‘हिट्स ऑल मेलोडीज’ यासारख्या नामवंत ऑर्केस्ट्रामधून त्यांनी विविध देशांत कार्यक्रम केले.

२०१३ साली त्यांनी स्वतःचा ‘म्युझिक कलर्स’ नावाचा ऑर्केस्ट्रा सुरू केला. त्यांनी ‘कमलाभवानी माते’च्या गीतांचा स्वतः गायन व संगीतबद्ध केलेला अल्बम प्रकाशित केला असून चार-पाच मराठी गाण्यांचे स्वतंत्र अल्बमही तयार केले आहेत. “जगावं कोणासाठी” या मराठी चित्रपटातही त्यांनी पार्श्वगायन केले आहे.

संगीतासोबतच ते सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. साक्षरता अभियान, बेटी बचाव-बेटी पढाव, आणि कोरोनाच्या काळात जनजागृती मोहिमेत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यांच्या या सर्वांगीण कार्याचा गौरव म्हणूनच बालगंधर्व रंगमंदिर परिवाराने त्यांना “युवा पार्श्वगायक” पुरस्काराने सन्मानित केले.

हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. मेघराजराजे भोसले व आमदार श्री. अतुल बेनके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते अभिजीत बिचुकले, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, चित्रपट दिग्दर्शक मेहता सर, अभिनेते पराग चौधरी, वर्षाताई संगमनेरकर, शोभाताई कुलकर्णी, जितू वायकर, अण्णासाहेब गुंजाळ, चित्रसेन भवर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सन्मानानंतर करमाळा तालुक्यातील अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


