गांजा प्रकरणात अटक झालेल्या जेऊर येथील इसमास अटींसह जामीन

करमाळा, दि. २९ जून – जेऊर (ता. करमाळा) येथे गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या इसमाविरोधात कारवाई करून अटक करण्यात आलेल्या महादेव बाबुराव फाळके (वय ६८) यांना अटींसह ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. ही सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश मलकापट्टे रेड्डी यांच्या समोर पार पडली.

दिनांक २९ मे २०२५ रोजी करमाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत माने यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जेऊर येथे एक इसम गांजासह येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक माने व त्यांच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचत जेऊर येथे कारवाई केली. यावेळी महादेव फाळके यांच्या ताब्यातून पांढऱ्या रंगाच्या पिशवीत सहा किलो आठ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. त्यांना ३० मे रोजी अटक करण्यात आली.

अटक झाल्यानंतर आरोपीच्या वतीने . निखिल पाटील यांनी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणी दरम्यान अॅड. पाटील यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, झडती व सापळा कारवाई करताना राजपत्रित अधिकाऱ्याची उपस्थिती आवश्यक असताना ती नव्हती. तसेच तपास पूर्ण झाला असून आरोपीचे वय लक्षात घेता त्याला जामिनावर मुक्त करण्यात यावे.

न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत, आरोपीला अटी व शर्तींसह आणि ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. निखिल पाटील, अॅड. दत्तप्रसाद मंजरतकर, अॅड. सतपाल नरखेडे व अॅड. श्रीराम अंधारे यांनी काम पाहिले.





