दाखल्यावर कुणबीच्या नोंदी कराव्यात - मराठा सेवा संघाकडून नगरपालिका शिक्षण प्रशासनकडे मागणी -

दाखल्यावर कुणबीच्या नोंदी कराव्यात – मराठा सेवा संघाकडून नगरपालिका शिक्षण प्रशासनकडे मागणी

0

करमाळा (दि. 29) : शहरातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर किंवा जनरल रजिस्टरवर “कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा” ही जात नमूद करण्यासाठी लेखी आदेश देण्यात यावेत, अशी मागणी मराठा सेवा संघ, करमाळा यांच्यावतीने नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे

  • शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या व “कुणबी” जातीचा दाखला असलेल्या विद्यार्थ्यांची जात जनरल रजिस्टरमध्ये स्पष्टपणे नमूद करावी.
  • इयत्ता २ री ते १२ वीपर्यंत शिकणाऱ्या व ज्यांच्याकडे “कुणबी/मराठा-कुणबी” जातीचा दाखला आहे अशा विद्यार्थ्यांची जातीची नोंद रजिस्टरमध्ये सुधारित करावी.
  • सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनास याबाबत लेखी आदेश देण्यात यावेत.

हे निवेदन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे आणि वरकटण्याचे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी श्री. सचिन काळे यांनी सांगितले की, “मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी व जातीच्या नोंदीसाठी तात्काळ प्रक्रिया व्हावी.”

प्रशासन अधिकारी श्री. अनिल बनसोडे यांनी निवेदनाची दखल घेत तात्काळ तोंडी सूचना दिल्या. केंद्रप्रमुख दयानंद चौधरी  यांनी नगरपालिका प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांना आवश्यक सूचना दिल्या.

पालक व विद्यार्थ्यांना आवाहन –
ज्यांच्याकडे “कुणबी” जात प्रमाणपत्र आहे त्यांनी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधून जनरल रजिस्टरमध्ये नोंद करून घ्यावी. पहिलीत नव्याने प्रवेश घेणाऱ्यांची जात थेट “कुणबी” अशी नमूद करण्याचे आवाहनही मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी केले.

या निवेदनाचे स्वागत सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनंदा जाधव माने, केंद्रप्रमुख दयानंद चौधरी व श्री. बनसोडे यांनी केले. श्री. अनिल बनसोडे यांनी लवकरच सर्व शाळांना अधिकृत पत्र देऊन अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. शेवटी, मराठा सेवा संघाने प्रशासनाचे आभार मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!