प्रा.अंबादास पांढरे यांना ‘स्व. सुखदेव साखरे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर

करमाळा(संदेश प्रतिनिधी): शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रमशीलता, समाजाभिमुख कार्य व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या योगदानाचा गौरव म्हणून यंदाचा पहिला ‘स्व. सुखदेव साखरे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास पांढरे यांना जाहीर झाला आहे.
राजुरी (ता. करमाळा) येथील श्री राजेश्वर विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक असलेले स्व. सुखदेव साखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून यावर्षी प्रथमच हा मान प्राचार्य पांढरे यांना मिळत आहे.

पांढरे सरांचे कार्य व योगदान..
28 वर्षांच्या सेवेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव उपक्रम. होतकरू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सातत्याने शैक्षणिक मदत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून पुनर्वसन. क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्याचे मोलाचे योगदान. सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने आघाडी व प्रेरणादायी कार्य.

पुरस्कार वितरण समारंभ..
हा पुरस्कार शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता स्व. साखरे सरांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित समारंभात प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष मा. तानाजी माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तर राजुरीचे सुपुत्र ह.भ.प. एकनाथ महाराज हंडे (राजुरीकर) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

पुरस्काराचे स्वरूप..
सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व रु. 11,000/- रोख रक्कम अशी या पुरस्काराची रचना आहे. या पुरस्कारासाठी कोणतेही अर्ज अथवा प्रस्ताव मागवले गेले नसून, स्व. साखरे सरांचे माजी विद्यार्थी – प्रा. डॉ. संजय चौधरी, कृषी अधिकारी देविदास सारंगकर, विक्रीकर अधिकारी तुकाराम जाधव, उद्योजक प्रवीण साखरे, स्टडी सर्कलचे संचालक सतीश मोरे, धनंजय साखरे आदींच्या समितीने सोलापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांमधून शोध घेऊन प्राचार्य अंबादास पांढरे यांची निवड केली आहे.
