उमरडमधील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी

0

केम(संजय जाधव) : उमरड परिसरात विविध अपघातप्रवण ठिकाणी तातडीने गतिरोधक उभारावेत अशी मागणी उमरड ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरड येथे कुंभेज फाटा–रामवाडी मार्गावर कोठावळे शॉपिंग सेंटरजवळील धोकादायक वळण आणि चौक परिसरात गतिरोधक उभारण्याची मागणी गरज आहे. या ठिकाणाहून एक रस्ता पूर्व सोगावकडे तर दुसरा उमरड गावाकडे जात असून येथे आठवडी बाजार भरत असतो. तसेच रस्त्यालगत जिल्हा परिषद शाळा असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. या परिसरात वारंवार अपघात घडत असून गेल्या आठ दिवसांत चार दिवसांच्या अंतराने उमरड येथील दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत. सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



चौधरी-वलटे वस्ती परिसरातही गतिरोधक उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या ठिकाणी बोगदा आणि तीव्र वळण असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

ग्रामस्थांनी स्वतःच्या पुढाकाराने उभारलेला गतिरोधक प्रशासनाने परवानगी न घेता काढून टाकल्याचा आरोपही करण्यात आला असून यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे.



आठ दिवसांत कार्यवाहीची मागणी

दोन्ही ठिकाणी आठ दिवसांच्या आत गतिरोधक उभारावेत, अन्यथा बहुजन संघर्ष सेना आणि ग्रामस्थांच्या वतीने राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या करमाळा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाटील आणि जगताप यांनी स्वीकारले.

यावेळी दत्तात्रय बडे, संतोष कोकरे, अशोक वलटे, कल्याण वलटे, हर्षद वलटे, दीपक वलटे, हनुमंत लठ्ठे, सोमनाथ लठ्ठे, शहाजी वलटे, सतीश वलटे, भीमराव वलटे, ब्रह्मदेव वलटे, सचिन बडे, मयूर वलटे, किरण वलटे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!