गाव माझा प्रतिष्ठानतर्फे शेलगाव क येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

करमाळा (प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे शेलगाव क येथील पायघन वस्ती शाळा तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेतील एकूण ५३ विद्यार्थ्यांना गाव माझा प्रतिष्ठान तर्फे शालेय साहित्याचे उत्साहात वाटप करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर आदी साहित्याचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पांडुरंग वीर सर होते. यावेळी व्यासपीठावर गावचे सरपंच प्रतिनिधी राहुल कुकडे, माजी उपसरपंच सचिन वीर, माजी ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ वीर, वैभव वीर, गणेश माने, डॉ. विकास वीर, मयूर वीर, बाबुराव माने, केशव दास, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण वीर, सचिन जगताप, मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव, मुख्याध्यापक भीमराव बनसोडे, नरसाळे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. विकास वीर यांनी सांगितले की, गाव माझा प्रतिष्ठान ही अनौपचारिक व नोंदणीकृत नसलेली संस्था असून, यामध्ये कोणतीही कार्यकारिणी नाही. “ज्यांना शेलगाव हा आपला गाव वाटतो, अशा सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी ही संकल्पना उभी केली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अंगणवाडी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे, बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळवून देणे, तसेच हरित शेलगावसाठी वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन आणि स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग वीर यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ११,००० रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच ह.भ.प. हरिहर महाराज यांनी ५,५५१ रुपयांची देणगी जाहीर करून उपक्रमास पाठबळ दिले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील युवा कार्यकर्ते धोंडीराम वीर यांनी शाळेला इन्व्हर्टर व बॅटरी संच भेट दिला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेकडून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावाच्या सामाजिक विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



