वर्दळीच्या भागात गॅस सिलिंडर भरलेले वाहन उभे करण्यास प्रतिबंध करण्याची मागणी

केम(संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथील संभाजी चौक परिसरात असलेल्या श्री उत्तरेश्वर गॅस एजन्सीकडून भरलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरचे पिकअप वाहन रहदारीच्या ठिकाणी उभे केले जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने संबंधित वाहनांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी प्रदीपसिंह गोरख सावंत यांनी केम ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संभाजी चौक हा केम गावातील प्रमुख वर्दळीचा भाग असून येथे दिवसभर नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी भरलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरचे वाहने नियमितपणे उभे राहतात. वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक ठरू शकतो. एलपीजी गॅस हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्याने आग, शॉर्टसर्किट अथवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या संदर्भातील छायाचित्रे उपलब्ध असून प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


