करमाळा तालुक्याची कन्या वैष्णवी पाटील भारताचे प्रतिनिधित्व करणार- दुबई, कोरिया आणि एशिया कपसाठी निवड

0


करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.२९: वरकुटे येथील कन्या वैष्णवी कुमार पाटील हिने नेमबाजीच्या (आर्चरी) क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. हरियाणातील सोनीपत येथे २६ ते २९ जून २०२६ या कालावधीत SAI NCOE येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आर्चरी निवड चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत वैष्णवीची एशियन यूथ आर्चरी चॅम्पियनशिप – दुबई KAA इनव्हिटेशनल आर्चरी स्पर्धा – दक्षिण कोरिया
एशिया कप – २०२६ या तीन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. सातारा येथील दृष्टी आर्चरी अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या वैष्णवीने सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या यशामागे दृष्टी आर्चरी अकॅडमीचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रशिक्षणामुळे अनेक खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळत असून, वैष्णवीचे हे यशही त्याच परंपरेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. वैष्णवी पाटील ही सध्या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी कॉलेजमध्ये बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही तिने मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वैष्णवीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!