महिलांनी कायदेशीर हक्कांची जाणीव ठेवावी – न्यायाधीश ए.आय.शेख

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.३०: महिलांसाठी संविधान व कायद्यात उपलब्ध असलेल्या विविध संरक्षणात्मक तरतुदी आहेत. झिरो एफआयआर, पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्याचा अधिकार तसेच मोफत कायदेशीर मदतीबाबत मार्गदर्शन हे अधिकार आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे, तसेच पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत योग व ध्यानाचा दैनंदिन जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) ए.आय.शेख यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालय परिसरात “कायदे विषयक जागरूकता शिबिर व ध्यान सत्र” आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश शेख बोलत होते. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश ए. के. शर्मा, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. पी. कुलकर्णी, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. वाय. ए. शिंपी, उपाध्यक्ष ॲड. आर. एस. सावंत, व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी ॲड. श्रीमती आर. आर. शिंदे यांनी महिलांच्या सुरक्षिततेविषयी, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. डॉ. बी. टी. हिरडे यांनी पर्यावरण व शुद्ध पाण्याच्या महत्त्वाविषयी, तर हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे रवी नंदकिशोर सोनी यांनी ध्यान व योगाविषयी मार्गदर्शन करून प्रत्यक्ष ध्यान सत्र घेतले.
या कार्यक्रमास वकील संघाचे सर्व सदस्य, न्यायालयीन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस. एल. जाधव यांनी केले, तर आभार ॲड. अंकिता वेदपाठक यांनी मानले.


