महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम सोनं हिसकावून चोर पळाले..

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
तालुक्यातील जातेगाव शिवारातील हिंदवी हॉटेलसमोर भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलवरून येत हिसकावून नेल्याची घटना २९ जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
याबाबत स्वाती दादासाहेब वारे (वय ४६, रा. जातेगाव, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्या आपल्या पतींना जेवणासाठी बोलाविण्यासाठी हिंदवी हॉटेलकडे गेल्या होत्या. मात्र पती तेथे न आढळल्याने त्या पायी घरी परतत असताना हॉटेलसमोरील पटांगणात दोन मोटारसायकलींवरून चार अनोळखी इसम आले. त्यापैकी एक मोटारसायकल रस्त्यावर उभी राहिली, तर दुसरी त्यांच्या जवळ आली. मोटारसायकलच्या मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या साखळीचे मिनी गंठण अचानक हिसकावून तोडले आणि दोन्ही मोटारसायकलीवरील चारही जण करमाळ्याच्या दिशेने वेगाने पसार झाले.
सोन्याच्या मिनी गंठणाची अंदाजे किंमत १ लाख ४० हजार रुपये असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!