करमाळा तालुक्यातील सायंकाळचे भारनियमन तातडीने थांबवा; दिग्विजय बागल यांची मागणी

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या सुरू असलेले सायंकाळच्या वेळेचे वीज भारनियमन रद्द करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नेते तथा मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, करमाळा मतदारसंघात सध्या दररोज सायंकाळी ग्रामीण भागात वीजेचे भारनियमन सुरू आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिके हातची गेली असून रब्बीसाठी अद्याप आवश्यक पाऊस झालेला नाही.

करमाळा तालुक्यातील मध्यम व पाझर तलावांमध्ये शेतीसाठी समाधानकारक पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे वीज भारनियमनामुळे नुकसान होत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या गौरी-गणपतीचे सण सुरू असल्याने ग्रामीण भागात सायंकाळच्या वेळी भारनियमन होत असल्यामुळे अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरीचे प्रकार होण्याची शक्यता आहे. तसेच या भारनियमनामुळे ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक, विद्यार्थी, महिला आणि शेतकरी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे बागल यांनी म्हटले आहे.

या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात सायंकाळच्या वेळेस सुरू असलेले वीज भारनियमन तातडीने रद्द करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी दिग्विजय बागल यांनी केली आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सोलापूर तसेच अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.


