राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे पुतळ्याचे करमाळ्यात दहन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचेबद्दल चुकीचे विधान केल्याने करमाळा शहरातील शिवप्रेमी पदाधिकाऱ्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पुतळ्याचे करमाळा शहरातील सुभाष चौक येथे जाळून दहन केले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून त्यांचेबद्दल अपशब्द आम्ही कदापि सहन करणार नाही. राज्यपाल कोश्यारी हे आत्तापर्यंत सतत महापुरूषांबद्दल चुकीचे वक्तव्य करून वाद निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा; अशी या शिवप्रेमींनी मागणी करून संतप्त प्रतिक्रियेने कोश्यारी यांच्या पुतळ्याचे जाळून दहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी सुभाष चौक व मेनरोड येथे पोलीस बंदाबस्त ठेवला होता.