पोंधवडीत “शेतकऱ्यांची शेतीशाळा” संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोंधवडी (ता.करमाळा) येथे 21 जुलै रोजी “शेतकऱ्यांची शेती शाळा” हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी करमाळा व मंडळ कृषी अधिकारी केतूर यांचे मार्फत घेण्यात आला. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत पोंधवडी येथे कडधान्य पिकाची शेती शाळा कृषी विभागाचे उमाकांत जाधव यांच्या मार्फत घेण्यात आली.
संपूर्ण राज्यात कृषी विभागामार्फत विविध योजनांमधून क्षेत्रीय अधिकारी/ कर्मचारी यांचेमार्फत पीकनिहाय शेती शाळा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
शेती शाळा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात पिकांचा आणि शेती पद्धतीचा अभ्यास करण्यास शिकविणे. शेती संदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्या व त्यावरील उपाय स्थानिक पातळीवरील शोधण्याचा प्रयत्न करणे. तसेच इतर प्रमुख पिकांवर उद्भवणारे कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच त्यांच्या नियंत्रणाच्या उपाययोजना याबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे.
सदर उपायांचा अवलंब करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य शेतकऱ्यांना प्रदान करणे, क्षेत्रीय स्तरावर पिकनिक तंत्रज्ञान व त्यासंबंधी कौशल्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, पर्यावरण पूर्वक व हवामान अनुकूल अशा शाश्वत उत्पादन पद्धतीला चालना देणे, सुधारित व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाद्वारे पिकांवरील विविध किडी रोग त्यावरील मित्र कीटक व त्यांची शेतीतील महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देणे, जमिनीतून व बियाद्वारे पसरणाऱ्या रोग व किडींचा पिकातील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक राबविणे अशा विविध प्रकारचे मार्गदर्शन या शेतीशाळेत दिले जाते.
तसेच पिकांचे पेरणीपूर्व ते काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत पीक वाढीच्या अवस्थेनुसार वर्गनिहाय मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे, इत्यादी उद्देशाने शेतकऱ्यांच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
पोंधवडी येथे उमाकांत जाधव यांनी तालुका कृषी अधिकारी, संजय वाकडे, मंडळ कृषी अधिकारी, देविदास चौधरी यांच्या मार्गदर्शनाने के.पी. मस्तूद यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कडधान्य पिकाच्या शेती शाळेचा कार्यक्रम घेतला.
यामध्ये मूग व उडीद या पिकांमधील रस शोषण करणाऱ्या किडी मावा, तुडतुडे ,फुल किडे, पांढरी माशी ,कोळी इत्यादी किड्यांचा संक्षिप्त अभ्यासाद्वारे सविस्तर माहिती शेतीशाळा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी शेतकऱ्यांना दिली. यामध्ये प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन सदर किडींचे नमुने गोळा करून त्या किडींचा जीवनक्रम सहभागी शेतकऱ्यांना समजावून सांगितला. तसेच या किडींचा अधिवास त्यांच्या खाण्याच्या पद्धती इत्यादी बाबत सविस्तर चर्चा केली या किडींच्या व्यवस्थापनाबाबत मित्र कीटकांचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच प्रथम आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या पुढे जर किडींची संख्या गेली तरच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्यास सांगितले. त्याआधी इतर विविध उपाय जसे की प्रयोगशाळेमध्ये संवर्धन केलेले मित्रकीटक शेतामध्ये सोडणे, जैविक कीटकनाशके यांचा वापर करणे, यामुळे पर्यावरणास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि उत्पादन खर्चात पण बचत होते.
या कार्यक्रमांमध्ये सहभागी शेतकरी बांधवांनी ही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी नाना मत्रे, अविनाश कोंडलिंगे (महाराज) महादेव भिसे ,आबा कोंडलिंगे, शत्रुघ्न वाघ ,मच्छिंद्र हीसाळवे, अजिनाथ भिसे, भरत ननवरे, प्रभू राऊत, जयराम कोलते, पुंडलिक नवगिरे, एकनाथ पांढरकर आप्पासाहेब गाडे, वासुदेव वाघ, इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.