धागा - Saptahik Sandesh

धागा

“तुमच्याकडे खादीचं कापड आहे का ….?” कापडाच्या दुकानात एक महिला दुकानदाराला विचारत होती …! तिच्यापुढे त्या दुकानदाराने दाखवलेल्या कापडांचा ढीग पडला होता… परंतु कोणतेही कापड तिला पसंत पडलेलं दिसत नव्हतं…!

माझंही थोडं फार तसंच झालं होतं…!’कोणती साडी घेऊ…?’ पुरता गोंधळ उडालेला…! त्या बाईलाही कोणतेच कापड पसंत पडत नाहीये हे पाहुन मलाही जरा बरं वाटलं …कोणी तरी आहे…आपल्यासारखं…!

दुकानदार पुन्हा मोठ्या उत्साहाने खादीचे तागे आणण्यासाठी वळला…! पु. ल. देशपांडे विनोदाने म्हणतात की ‘कापड दुकानात काम करणारा माणूस हिमालयात जाऊन योगसाधनेचा अनुभव घेऊन येत असावा…! कारण कितीही कापडाचे नमुने दाखवले तरी त्यातले कापड पसंत न करता अमुक प्रकारामध्ये तमुक सूत…. आणि अंजिरी रंग दाखवा…!’ असं चमत्कारिक कॉम्बिनेशन जरी ग्राहकांनी मागितलं तरी देखील न वैतागता दुकानदार पुन्हा कापड शोध मोहीम हाती घेतो…!

दुकानदाराने खादीच्या कापडाचे तागे तिच्यापुढे टाकले…! त्या ताग्यातले ते खादीचे कापड कुठेतरी मनाला स्पर्शून गेले…! खूप खूप ओळखीचे वाटले… परंतु लक्षात मात्र येत नव्हते…! आणि अचानक खादीच्या वेषातले आमच्या शाळेतले सर डोळ्यापुढे आले…! शाळेतले ते सर्वात सिनिअर…जेष्ठ सर…! त्यांच्या अंगावर सदैव खादीचे कपडे असायचे… ते महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी आणि स्वातंत्र सैनिकही होते…! इंग्रजांच्या काळातल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या त्यांच्या कथा ते खूप रंगवून सांगायचे…! अंगावर रोमांच उभे रहात…! सारा वर्ग देशभक्तीच्या रंगात रंगून जाई…! सरांच्या अंगावरच्या खादीवर देखील देशभक्तीचा रंग चढे…!

दुकानदाराने खादीच्या कापडाचे तागे तिच्यापुढे टाकले…! त्या ताग्यातले ते खादीचे कापड कुठेतरी मनाला स्पर्शून गेले…! खूप खूप ओळखीचे वाटले… परंतु लक्षात मात्र येत नव्हते…! आणि अचानक खादीच्या वेषातले आमच्या शाळेतले सर डोळ्यापुढे आले…! शाळेतले ते सर्वात सिनिअर…जेष्ठ सर…! त्यांच्या अंगावर सदैव खादीचे कपडे असायचे… ते महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी आणि स्वातंत्र सैनिकही होते…! इंग्रजांच्या काळातल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या त्यांच्या कथा ते खूप रंगवून सांगायचे…! अंगावर रोमांच उभे रहात…! सारा वर्ग देशभक्तीच्या रंगात रंगून जाई…! सरांच्या अंगावरच्या खादीवर देखील देशभक्तीचा रंग चढे…!

‘ एक नूर आदमी दस नूर कपडा..!’ असं म्हणतात..! पण प्रत्येक कापडाचाही नूर काही वेगळाच असतो…! मग तो सूटबूट असा इंग्रजी साहेबांचा ड्रेस असो… किंवा सलवार धोती कुडता असा अस्सल देशी पोशाख … टी-शर्ट जीन्स असो किंवा अगदी पारंपरिक साडी…!आपली वेशभूषा ही आपल्या चारित्र्याचा आरसा असते…! वेशभूषेवरून व्यक्तिमत्त्वाचा बोध घेता येतो… शालीनता… संस्कार… या गोष्टी देखील अभिव्यक्त होतात त्या वेशभूषेमधुनच…! परंतु कित्येक वेळा ‘देश तसा वेष ‘ घ्यावा लागतो… नाहीतर साध्या सुध्या सरळ मार्गी गावात टी-शर्ट जीन्स घातलेली तरुणी चेष्टेचा विषय बनते, तर मोठ्या शहरातल्या मॉड कॉलेजमध्ये साधी साडी परिधान केलेली तरुणी काकूबाई ठरते …!

तर असे हे वस्त्र… अनेक धाग्यापासून तयार होणारं…! धाग्यांचं कामच मुळी जोडण्याचं…! मग तो राखीचा प्रेमळ धागा असो, अथवा यज्ञोपविताचा पवित्र धागा असो… ! किंवा अगदी वटपौर्णिमेला वटवृक्षाला गुंडाळलेला गुंडाळला जाणारा श्रद्धेचा धागा देखील…! प्रत्येक धाग्यामध्ये त्या भावनांची गुंतवणूक असते.
रहीमने तर प्रेमाला सुद्धा एक धागा असे संबोधले आहे… आणि त्या धागाचे वैशिष्ट्य देखील सांगितले आहे…

“रहिमन धागा प्रेम का ना तोडो खिचताय…
टूटेसे फिर ये ना जुडे…, जुडे तो गाठ पड जाये…!”

असे हे धागे…परस्परांशी घट्ट जोडले जातात आणि बनते एक वस्त्र…! सध्या कारखान्यात तयार होणारं हे धाग्याचं वस्त्र… पूर्वी विणकर तयार करीत…! मोठ मोठी यंत्रसामुग्री नसताना देखील ही वस्त्र मोठ्या कौशल्याने विणली जायची…! आणि अशी सुंदर वस्त्र विणत असताना संत कबीरांनी दिला जीवनरूपी वस्त्रांचा दृष्टांत…!

जीवन हे देखील वस्त्रच आहे… चादरच आहे…!
कशी विणली जाते ती..?
संत कबीर म्हणतात,
“चदरिया झीनी रे झिनी
राम नाम रस भिनी…
अष्टकमल का चरखा लगाया…
पाँच तत्व की पूनी…! “
प्रकृती पुरुषाच्या आठ तत्वांचा चरखा… आणि पृथ्वी ,जल ,तेज, वायू ,आकाश या पांचभौतिक तत्त्वांपासून बनलं हे जीवन रूपी वस्त्र… जीवन रुपी चादर…!
अतिशय कौशल्याने बनलेली ही चादर ‘झीनी’ अर्थात अतिशय तलम आहे…!
आणि नंतर…
“जब मोरी चादर बन घर आई रंगरेजको दीन्हि… ऐसा रंग रंगा रंगरेने… की लालो लाल कर दीन्हि….!”
ही चादर गुरूंकडे दिली…गुरूंच्या संस्काराचा रंग असा चढला… आणि त्या रंगातच ती रंगून गेली…!
….कविवर्य ग. दि. माडगूळकर देखील आयुष्याला वस्त्राचीच उपमा देतात…
” एक धागा सुखाचा… शंभर धागे दुःखाचे…
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे…!
मुकी अंगडी बालपणाची… रंगीत वस्त्रे तारुण्याची …
जीर्ण शाल मग उरे शेवटी …लेणे वार्धक्याचे…!
पांघरसी जरी असला कपडा …
येशी उघडा जाशी उघडा… कपड्यासाठी करशी नाटक तीन प्रवेशाचे…!”
येथून जाताना हे शरीररुपी वस्त्र आपल्याबरोबर येणार नाही… परंतु सत्कर्म…दुष्कर्म… ह्या कर्मांच्या रंगात रंगलेला आत्मा…. परमात्म्याच्या दरबारी जाणार आहे….!आणि म्हणूनच हे जीवनरूपी वस्त्र डागरहित ठेवणं आपल्याच हातात आहे…! कारण कपड्यावरचा डाग साबणाने निघेल परंतु जीवन रुपी वस्त्रावर चा डाग…? तेव्हा सावधान…!
घटस्थापनेच्या पूर्व संध्येला सर्व वस्त्रे तर आपण दरवर्षीच धुवत आलो आहोत…पण जीवनरुपी वस्त्रावरचे क्रोध मान माया लोभ हे डाग धुता आले पाहिजेत…तर आणि तरच सुविचारांचे अंकुर रुजतील… घटातील धान्याप्रमाणे….!

डॉ. सुनिता दोशी मो.नं.7249446891

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!