"आम्ही भारताचे लोक..." - Saptahik Sandesh

“आम्ही भारताचे लोक…”

२६ जानेवारी १९५० म्हणजेच प्रजासत्ताक दिन होय. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी नवी राज्यघटना लागू होईपर्यंत म्हणजे २६ जानेवारी १९५० पर्यंत भारताला वसाहतीचे राज्य म्हणण्यात येत होते.घटनेच्या अंमलबजावणीनंतर भारत हे सार्वभौम राष्ट्र बनले, अशा या सार्वभौम राष्ट्रास या राष्ट्रातील प्रत्येक नागरिकास घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून मूलभूत अधिकार बहाल केले.मतदानाचा अधिकार पूर्वी राजघराणे, सरंजामदार, धनाढ्य लोक जे टॅक्स भरत त्यांच्यापूर्ता मर्यादित होता , संविधानाच्या अंमलबजावणीनंतर हा मतदानाचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना बहाल झाला युरोपातील इंग्लंड अमेरिकेसारख्या देशात सुरवातीला महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशात महिलांना मतदानाचा अधिकार देऊन समानतेचा हक्क अधोरेखित केला ही विशिष्ट बाब आहे.

व्यवसायाच्या क्षेत्रातही मूठभर लोकांची मक्तेदारी होती नंतर राज्यघटनेने भारतीय लोकांनी देशात कुठेही वास्तव्य करुन व्यवसाय करण्याचा अधिकार दिला. तसेच कलम १९ अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार, भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम २१ जिवीत स्वातंत्र्याचे रक्षण, कलम २३ शोषणाविरुद्धचा हक्क, कलम २५ ते २८ धर्मस्वातंत्र्याचा हक्क,कलम २९ ते ३० सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क असे इत्यादी अधिकार जनतेला प्रदान केले.प्रजासत्ताकाची ७४ वर्ष पूर्ण होऊन देश आज अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. आणि ही वाटचाल होत असताना देशाचा आर्थिक विकास होतोय हे जरी सरकारकडून सांगण्यात येत असले तरी राज्यघटनेच्या केंद्रस्थानी असलेल्या सर्वसामान्य भारतीयांचा विकास मात्र खुंटलेला दिसतो, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न,असे अनेक प्रश्न आज देशाला भेडसावत आहेत.देशाची लोकसंख्या १४० कोटींवर पोहचून लोकसंख्या वाढली ,भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो परंतु हाच युवक वर्ग आज रोजगाराअभावी नैराश्येच्या गर्तेत सापडून व्यसनाच्या आहारी जात आहे, तसेच MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा असो की सरळसेवा परिक्षा असो अशा परीक्षांकडे अनेक उच्च शिक्षित युवा पिढीचा लोढा वाढत आहे ऐन तारुण्याच्या उमेदीच्या वर्षात वेगळं काहीतरी करुन यशस्वी होण्या ऐवजी १०-१० वर्ष स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत आहे पण बहुतेकांच्या पदरी निराशाच पडत आहे.पदवी घेऊन कागदी घोडे नाचवून नोकरी मिळवणे जिकरीचे झाले आहे, त्यामुळे युवा पिढीने कौशल्य आधारित शिक्षण घेतले तरच आज युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे,व तो स्वत कौशल्य आत्मसात करुन नोकरी देणारा होणार आहे.

अशाच प्रकारे आज आपला शेतकरी राजा दुष्काळाच्या झळा सोसत सोसत आपलं पिक जपत आहे, परंतु त्याच्या पिकालाही योग्य भाव मिळत नाही.उत्पादनाचा खर्च सुद्धा वसुल होत नाही हाता तोडांशी आलेली पिक निसर्गाच्या लहरीपणामुळे निस्तनाबूत होत आहेत, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पाण्याचे योग्य नियोजन करून बरेच शेतकरी चांगल उत्पादन मिळवत आहेत ही थोडीशी समाधानकारक बाब आहे शेतकऱ्यांनी आता पारंपारिक शेतीसह आधुनिक शेतीची कास धरून वेगवेगळे पिक घेऊन त्यासाठी योग्य बाजारपेठेचा अंदाज घेऊन वाटचाल करुन आर्थिक सधनता प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.

दुसरीकडे महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य माणूस आज होरपळून जात आहे, आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च भागवता भागवता त्याचे कंबरडं मोडक झालं आहे.आरोग्याच्या समस्याही नामोहरम करत आहेत,अशी एकंदरीत परिस्थिती आहे,या सर्व समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी योग्य लोक प्रतिनिधी निवडून देणे मतदारांची जबाबदारी आहे पण हा मतदार राजाच जर नेतेमंडळींच्या आमिषाला बळी पडून खोट्या प्रचाराला भूलून तसेच जातीय व धार्मिक दृष्टिकोन ठेवून मतदान करत असेल तर मग या सर्व नागरिकांच्या मूलभूत समस्यांना कोणी वालीच उरत नाही त्यामुळे मतदारांनी जागृत होऊन जात पात धर्म बाजूला सारून जो लोक प्रतिनिधी प्रामाणिकपणे आपल्या समस्या शासनाकडे मांडून तो सोडविण्यासाठी प्रयत्न करेल विकासाची जनतेची कामं करेल असाच योग्य प्रतिनिधी निवडून आणला तरच बदल होईल.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा मिडिया, पत्रकार,वर्गही आज प्रस्थापित नेत्यांचा दलाल म्हणून काम करताना दिसतो.काही ठराविक मिडिया व पत्रकारच जनतेचे मूलभूत प्रश्न असो,वा मंत्र्यांचे भ्रष्टाचार असो, बेरोजगारीचा प्रश्न असो, अशा प्रकारचे प्रश्न जीवावर उदार होऊन मांडत आहे त्यामुळे अशा प्रामाणिक,शोध पत्रकारिता करणाऱ्या धाडसी पत्रकारांच्या पाठीशी आपण नागरिक म्हणून ठामपणे उभं राहणे गरजेचे आहे. देश आज अमृत महोत्सवात पदार्पण करत आहे नवीन संकल्पना, कल्पकता यांना वाव आहे त्यामुळे भारतीय म्हणून आपण सर्वांनी त्या दृष्टीने प्रयत्न करुन आपला व देशाचा विकास कसा होईल हे ध्येय ठेवून वाटचाल करण्याची गरज आहे.
त्यामुळे या नववर्षात नव्या जिद्दीने मार्गक्रमण करुन शेतकरी,युवक वर्ग, सर्वसामान्य नागरिक, यांनी जिद्द व चिकाटी अंगीकारुन आपापल्या क्षेत्रात कौशल्य आधारित असो की अनुभवा आधारित यांची सांगड घालून प्रगतीकडे वाटचाल करावी यांसह संविधानाचे रक्षण केले तर संविधान तुमचे रक्षण करेल त्यामुळे प्रत्येक भारतीयाने आम्ही भारतीय लोक म्हणून एकसंध राहून देशासाठी कार्य करुन प्रथमतः भारतीय अंतिमतः भारतीय हीच ओळख कायम राखावी हीच सदिच्छा.

त्यामुळे या नववर्षात नव्या जिद्दीने मार्गक्रमण करुन शेतकरी,युवक वर्ग, सर्वसामान्य नागरिक, यांनी जिद्द व चिकाटी अंगीकारुन आपापल्या क्षेत्रात कौशल्य आधारित असो की अनुभवा आधारित यांची सांगड घालून प्रगतीकडे वाटचाल करावी यांसह संविधानाचे रक्षण केले तर संविधान तुमचे रक्षण करेल त्यामुळे प्रत्येक भारतीयाने आम्ही भारतीय लोक म्हणून एकसंध राहून देशासाठी कार्य करुन प्रथमतः भारतीय अंतिमतः भारतीय हीच ओळख कायम राखावी हीच सदिच्छा.

✍️ समाधान दणाने, Mo. 7218844652, करमाळा जिल्हा – सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!