गावातील मंदिरासाठी चक्क एक गुंठा जमीन केली दान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : सध्याच्या काळात जमिनीचे भाव गगनाला भिडले असल्याने एक-दोन इंच जमिनीच्या वादावरून कोर्टाची पायरी चढणाऱ्या लोकांच्या जमान्यात पांगरे (ता.करमाळा) येथील माजी उपसरपंच चंद्रकांत शिवाजी पाटील यांनी गावातील मंदिरासाठी स्वतः च्या मालकीची चक्क एक गुंठा जमीन दान केली आहे.
पांगरे गावात तुळजाभवानीचे जुने व छोटे मंदिर असून या मंदिरालगतच नवीन मंदिर बांधण्याचे नियोजन पांगरे ग्रामपंचायतचे आहे. मंदिर कामासाठी पांगरे ग्रामपंचायतीला शासनाकडून पाच लाखाचा निधी आलेला आहे, परंतु जागेची अडचण असल्यामुळे काम थांबले होते.
यातून मार्ग काढण्यासाठी पांगरे ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थांनी एक बैठक घेऊन चंद्रकांत पाटील यांना या अडचणी विषयी माहिती दिली. झालेल्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मालकीची एक गुंठा जमीन मंदिरासाठी देण्याचे मान्य केले व त्यानुसार बॉण्ड पेपरवर लिहून देऊन जमीन बक्षिस पात्र करून दिली.
या बैठकीला पांगरे ग्रामपंचायत मा.उपसरपंच संजय भाऊ गुटाळ,भैरवनाथ दादा हराळे, भारत नाना टेकाळे,पिंटू पाटील, नितिन पाटील,नागा अप्पा पाटील,सतिश आबा पाटील, गहिनीनाथराजे गुंजाळ,विनोद महाडिक,सचिन पाडसे, भारत नाना जाधव, राजेंद्र गुरव, विनायक उघडे,संतोष गणगे, प्रदीप टेकाळे, अप्पा धडस, धनाजी पाटील,शहाजी टेकाळे,नागेश वडणे, नेताजी पाटील,स्वप्निल पाटील,दिपक पाटील,अमोल पवार,नागेश शेंडगे, उत्तरेश्वर गुरव,विठ्ठल गुटाळ छबन उघडे,अण्णा भगत आदीजण उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. सोनवणे, ग्रामविकास अधिकारी समाधान कांबळे आदींनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.
गावाच्या विकासासाठी गटतट न पाहता सर्वांनी गावासाठी काही ना काही मदत करणे गरजेचे आहे. मंदिर बांधणी सारखे चांगले काम करताना जागेची अडचण समजल्यावर मी माझी १ गुंठा जमीन ग्रामपंचायतीला दिली. माझ्या हातून ही जी मदत झाली आहे याचे मला व परिवाराला समाधान आहे. — चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच, पांगरे