करमाळा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर – शासनाकडून आदेश जारी
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यात शासनाने मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. याबाबत आजच (ता.३१) शासनाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी राज्यातील ४० तालुक्यांसाठी दुष्काळाची घोषणा केली आहे.
राज्यातील १५ जिल्ह्यात हा दुष्काळ जाहीर केला असून त्यातील २४ तालुक्यामध्ये गंभीर तर १६ तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या ४० तालुक्यात जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुर्नगठन, शेतीशी निगडीत पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे अशा पध्दतीच्या सवलती मिळणार आहेत. याप्रमाणेच दुष्काळातील अन्य सवलतीही या दुष्काळात मिळणार आहेत. राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, छ.संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली अशा १५ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी, माळशिरस, सांगोला येथे गंभीर स्वरूपाचा तर करमाळा व माढा येथे मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.