मकाईच्या ऊस बिलासाठी प्रा. राजेश गायकवाड यांचे उपोषण सुरू

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या ऊस गळीत हंगामाची बिले अद्याप दिलेली नसल्याने ही बिले मिळावीत यासाठी निलज येथील प्रा. राजेश गायकवाड यांनी संगोबा येथील आदिनाथ महाराज मंदिर येथे आज (दि.३१) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या ऊस गळीत हंगामाची बिले अद्याप दिलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. ३० ऑक्टोबर पर्यंत मकाई कारखान्याने ऊस बिले शेतकऱ्यांना दिली नाही तर ३१ ऑक्टोबरला संगोबा येथील आदिनाथ मंदिरात मी आमरण उपोषण सुरु करणार, असा इशारा निलज(ता.करमाळा) येशील प्रा. राजेश गायकवाड यांनी याआधी दिला होता, परंतु याची दखल कारखाना प्रशासनाने घेतली नसल्याने त्यांनी आज पासून उपोषण सुरू केले आहे.

यावेळी उपोषणाविषयी अधिक माहिती देताना श्री.गायकवाड म्हणाले की, मागील हंगामात मकाईने ऊस नेऊन दहा ते अकरा महिने झाले आहेत. पण मकाईने शेतकऱ्यांचे ऊस बिल दिले नाही. शेतकऱ्यांचे महत्वाचे सण पोळा, गणेशोत्सव, दसरा असे कितीतरी सण आले आणि गेले आता दिवाळीचा सण तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांना हक्काचे पैसे अजून मिळत नसतील तर आमरण उपोषण हाच पर्याय राहिला आहे. कारखान्याचे एम. डी., जबाबदार अधिकारी फोन उचलत नाहीत.

आज ३१ ऑक्टोबर पासून मी आमरण उपोषण सूरु केले असून माझ्या उपोषणा दरम्यान माझे काही बरे वाईट झाल्यास त्यास संपूर्ण मकाई चे तत्कालीन अध्यक्ष,संचालक मंडळ हे जबाबदार असणार आहेत. त्यांच्या उपोषणास शेतकरी वर्गातून पाठिंबा दिला आहे.

ऊस उत्पादक संतप्त ! – कारखान्यांनी तात्काळ बिले द्यावीत – अन्यथा शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!