शेतकरी कंपनीच्या माध्यमातून लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचा कायापालट – शरद ढवळे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.5) : लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी शेतकरी कंपनीच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि संशोधनात्मक बाबी बरोबरच बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न झाले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा कायापालट झाला आहे,अशी माहिती कर्जत- जामखेड ॲग्रो फार्मस कंपनीचे उपाध्यक्ष शरद ढवळे यांनी दिले आहे. हळगाव (ता.जामखेड ) येथे कर्जत-जामखेड ॲग्रो फार्मर्स कंपनीच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहे.याबरोबरच शेतकऱ्यांच्या लिंबू उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी मार्गदर्शन तसेच वेगवेगळ्या प्रकारची खते उपलब्ध देऊन प्रशिक्षणही देण्याच्या उपक्रम राबवला जात आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील अनेक लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना लिंबू उत्पादन वाढवणे आणि त्याला बाजारपेठ मिळवण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्याला लिंबू उत्पादनामध्ये गोडी निर्माण झाली आहे.
याबाबत जादा माहिती देताना या संस्थेचे उपाध्यक्ष श्री ढवळे म्हणाले की, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे भविष्य घडण्यासाठी आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून व ‘बारामती ऍग्रो’ चे सर्वेसर्वा राजेंद्र दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले आहेत. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन विशेष नागपूर येथे राष्ट्रीय लिंबू संशोधनामध्ये घेऊन जाऊन लिंबू पिकाविषयी सर्व माहितीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले.
याचबरोबर लिंबापासून काय काय उत्पादन केले जाते याबाबत माहिती दिली.या बरोबरच बारामती येथील विज्ञान केंद्रामध्ये सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या माध्यमातून येथील हजारो शेतकऱ्यांना वेगवेगळया ठिकाणी नेहून मार्गदर्शन प्राप्त झालं आणि मग शेतकऱ्यांमध्ये लिंबू उत्पादनात वाढ झाली आहे. त्यानंतर आम्ही हाळगाव येथे 20 टनी बायोमास कोल्ड स्टोरेज निर्माण केले आहे.बाजूला दोन केवीचा सौर ऊर्जेचाही प्लांट लावलेला आहे.त्यामुळे विजेची गरज लागत नाही. वीज असो नाहीतर नसो या ठिकाणी आमचं कोल्ड स्टोरेज मात्र कार्यरत राहते. लिंबासाठी साधारणतः 9 टेंपरेचर अवश्यक असते आणि ती बाब दिवसभराच्या या बायोमासच्या माध्यमातून पूर्ण होते. दर कमी असेल तर आम्ही लिंबू कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवतो. दर चांगला असेल तर पॅकिंग करून तो वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतो.यामुळे सभासदांना योग्य तो भाव पण मिळतो आणि जे उत्पादन आहे ते थेट मोठ्या बाजारात जाते. असेही श्री. ढवळे यांनी सांगितले.
बाजारातलिंबाला दर कमी आहे त्या कालावधीमध्ये हे लिंबू सांभाळण्यासाठी कोल्ड स्टोरेज गरज आहे.कोल्ड स्टोरेज मध्ये जर लिंबू ठेवलं तर कमीत कमी 60 दिवस लिंबू चांगलं राहतं,ठेवताना मात्र क्वालिटी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे आणि योग्य ती त्यावरती प्रक्रिया केली तर मात्र कुठल्याही प्रकारे लिंबू उत्पादकाला धोका राहात नाही.या दृष्टीने आम्हाला हे सर्व काम करत असताना राजेंद्र दादा पवार व आमदार रोहितदादा पवार हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात, सर्व प्रकारची मदत करतात. त्यांनी हजारो शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रयोग दाखवले आहेत,प्रत्यक्ष चांगल्या बागा दाखवलेल्या आहेत,प्रत्यक्ष शास्त्रज्ञांशी चर्चा घडवलेली आहे.या सर्व बाबीमुळे या भागातील लिंबू उत्पादक शेतकरी शाश्वत शेती म्हणून त्या लिंबू शेतीकडे पाहत आहे असेही श्री.ढवळे यांनी सांगितले आहे.
आपल्याकडे लिंबू खालच्या फांदीला म्हणजे गळ फांदीला जास्त असते असा गैरसमज आहे त्यामुळे आपण छाटणीकडे दुर्लक्ष करतो.वास्तविक पहाता लिंबाला छाटणी अत्यंत गरजेची आहे.तसेच वाळलेल्या फाटे सुद्धा काढले पाहिजेत.तरच लिंबू योग्य प्रकारे काढता येते.खालच्या बाजूला बोर्ड पेस्टही केली पाहिजे. लिंबाच्या बाबतीत व्यवस्थित काळजी घेतली तरच बाजारात त्याला दुपटीने भाव मिळतो.प्रत्येक शेतकऱ्याने लिंबू बागा ह्या जतन केल्या पाहिजेत.देशामध्ये जयपूर, दिल्ली आणि सुरत या तीन ठिकाणी लिंबाला अतिशय चांगली मागणी आहे.फक्त त्यासाठी कॉलिटी ची गरज आहे. लिंबू उत्पादन असे आहे की, एकदा झाड लावले की तुम्हाला कमीत-कमी दहा ते पंधरा वर्षे दुसऱ्या कुठल्याही प्रकारे त्रास घेण्याची आवश्यकता नाही.याचमुळे जामखेड तालुक्यातील हळगाव बरोबरच फक्रबाद, पाटोदा या ठिकाणी कोल्ड स्टोरेज झालेले आहेत आणि लवकरच कर्जत येथे एक कोल्ड स्टोरेज उभारले जात आहे.कोल्ड स्टोरेज ची संख्या वाढत आहे . लिंबू व्यवसायात बाजारात चढउतार असतो आणि हा चढ-उतार जर आपल्याला व्यवस्थितरित्या हँडल करता आला तर शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचा दर मिळू शकतो.