उजनीने गाठली तळपातळी - 755 अश्वशक्तीचे पंप झाले थंड - Saptahik Sandesh

उजनीने गाठली तळपातळी – 755 अश्वशक्तीचे पंप झाले थंड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : उजनीच्या पाण्याने तळपातळी गाठल्याने दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी उपसणे बंद झाले आहे. उजनीत पाणी नसल्याने दहिगाव येथील ७५५ अश्वशक्तीचे सहाच्या सहा पंप व दुसऱ्या टप्प्यातील ७३० अश्वशक्तीचे चारही पंप बंद पडले आहेत.

त्यामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून तालुक्याच्या पूर्व भागातील निंभोरे, साडे, लव्हे, घोटी, गुळसडी, सरपडोह, सौंदे, कोंढेज, कुंभेज आदी गावातील शेतकऱ्यांच्या बागायती पिकाला पाणी नसल्याने पिके कोमेजून गेली आहेत. दुर्दैवाने पावसाळाही लांबल्याने या भागातील शेतकरी निराश झाले आहेत. उजनीवरील दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी दहिगाव येथुन उपसा केले जाते. दहिगाव येथील उजनी जलाशयात ७५५ अश्वशक्तीचे सहा पंप बसविले आहेत. त्यापैकी चार पंप पाणी उपसण्यासाठी वापरले जातात.

हे पाणी उजनीपासून तीन किलोमीटर लांब दीड मीटर व्यासाच्या दोन पाईपातून नेले जाते. तेतून पुढे साडेदहा किलोमीटर कुंभेज पर्यंत कॅनॉल असून त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होतो. दुसऱ्या टप्प्यावर ७३० अश्वशक्तीचे चार पंप असून त्यापैकी दोन पंप चालवले जातात. तेथून पुढे १९ किलो मीटरचा मेन कॅनॉल आहे. उजव्या बाजुला अकरा लघुवितरीका तर डाव्या बाजूला सात लघुवितरीका आहेत. अशाप्रकारे २९ लघुवितरीकेद्वारे शेतकऱ्याच्या शेती पर्यंत पाणी पोहोचवले जाते. याचे नेटवर्क २४० किलोमीटर आहे. परंतू अद्यापही खूप कामे अपुरी असल्याने साधारणत: ११५ किलोमीटर पर्यंतचे नेटवर्क कार्यरत आहे. सध्याच्या स्थितीला घोटी, निंभोरे, साडे, लव्हे, पांडे, गुळसडी, सरपडोह, सौंदे, कोंढेज, कुंभेज आदी गावात दहिगाव आवर्तनाचे पाणी येत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी शेतीत लाखो रूपयाची गुंतवणूक केली असून गेल्या सव्वा महिन्यापासून दहिगावचे आवर्तन येत नसल्याने येथील शेतकऱ्यांचे करोडो रूपयाचे नुकसान होत आहे.

गेल्या तीन वर्षापासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी योग्यरितीने मिळाले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे झाला. यावर्षी केळीच्या पिकाने चांगली साथ दिली. या भागातील शेतकरी आनंदात असतानाच यावर्षी उजनीने तळ पातळी गाठली. त्यामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून दहिगावचे आवर्तन बंद आहे. त्यामुळे या भागातील केळी, पोपई, ऊस आदी पिके सुकून गेली आहेत. शासनाने एढा मोठा खर्च केलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही मोठी गुंतवणूक केली आहे. अशा स्थितीत उजनीचे पाणी नसल्याने शासन व शेतकरी यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यावर नियंत्रणाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!