करमाळा(दि.२३) : करमाळा तालुक्यात दि इंडीया ह्युम पाईप कंपनीकडून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कॅनॉलमध्ये पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. कुंभेज येथील कॅनॉलमध्ये टाकण्यासाठी आणलेले पाईप अज्ञात व्यक्तीने जाळून लाखोंचे नुकसान केले आहे. या संदर्भात कंपनीचे साईट मॅनेजर नचिकेत दिलीप राजमाने यांनी अज्ञात व्यक्ति विरोधात करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार १५ फेब्रुवारी सायंकाळी सहा ते दि. १६ फेब्रुवारी पहाटे पाच वाजताच्या कुंभेज येथील संदीप भोसले यांच्या शेती गट नं. ५६१ मध्ये घडला आहे. कॅनॉल मध्ये ठेवण्यात आलेले रु. १५,०१,४१४ किंमतीचे २४ पाईप दि. कोणीतरी अज्ञात इसमाने विस्तवाने जाळुन नूकसान केले आहे. या संदर्भात पोलीस तपास करत आहेत.
सदर काम गेले २ महिन्यांपासून बंद असल्याने व आता अज्ञात व्यक्तीने हे पाईप जाळल्यामुळे विरोधकांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्यावर व त्यांच्या कार्य कर्त्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
गेल्या २ महिन्यापासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे बंद पाईपलाईनचे काम बंद पाडले आहे. या बंद असलेल्या कामामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेती वहिवाटीला अडचण येत आहे, चाऱ्या खोदलेल्या आहेत ,पाईप शेतामध्ये पडलेले आहेत परंतु काम मात्र बंद आहे. तालुक्याचा विकास करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असताना खुद्द लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तेच त्यांच्या सांगण्यावरून हे काम बंद पडत आहेत, योजनेचे पाईप जाळत आहेत हे दुर्दैव आहे. तालुका पुन्हा एकदा अशा प्रवृत्तीमुळे विकासापासून कोसो मैल दूर जाणार असल्याची खंत आहे. सदर काम तात्काळ सुरू न केल्यास आपण मोठे जनआंदोलन उभा करणार आहे.
आमदारकीचा शपथविधी होण्यापूर्वीच माझ्या गावाच्या हद्दीत (देवळाली) सुरू असलेले बंद नलिकेचे काम बंद पाडून संबंधित पोकलेन चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडल्याची बातमी मला समजल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी पोकलेन चालकाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. माझा मोबाईल नंबर त्यांना दिला. काम तुम्ही सुरू ठेवा जर नंतर कोणी बंद पडायला आले तर मला संपर्क साधा असे त्यांना सांगितले. त्यानुसार २ दिवसांनी मला फोन आल्यानंतर मी ३० नोव्हेंबर २०२४ रोजी साइटवर पोहोचलो. निंभोरे गावातील गोरख जाधव हा कार्यकर्ता आबांच्या सूचनेनुसार हे काम बंद ठेवायला सांगितले आहे असे सांगत होता. संबंधित कंपनीने नूतन आमदारांची भेट घ्यावी त्यानंतर काम सुरू करावे असे त्यांनी सांगितले. त्यानुसार तुर्त काम बंद ठेवायला आपण सहमती दर्शवली. हे भेटतील नंतर मात्र माझ्या गावाच्या हद्दीत असली गुंडगिरी मी खपवून घेणार नाही असे मी बोललो. या गोष्टीला आज ३ महिने होत आले, परंतु अद्यापही काम सुरू झालेले नाही. हे काम बंद पाडण्याचे, पाईप जाळण्याचे पाप विद्यमान आमदारांचेच आहे.
● आशिष गायकवाड, माजी सरपंच, देवळाली
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे बंद नलिका वितरण प्रणालीचे काम मागील १ वर्षांपूर्वी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते. हे काम गेल्या २ महिन्यापासून काम बंद आहे. सदर काम पूर्ण झाल्यास दहिगाव योजनेसाठी मंजूर असलेल्या १.८१ टीएमसी पाण्यापैकी ०.५० टीएमसी पाण्याची बचत होणार असून त्यामुळे दहिगाव योजनेच्या लाभक्षेत्रातील गावाव्यतिरिक्त देवळाली, झरे ,मलवडी, वरकुटे, पाथुर्डी, रोपळे, हिसरे ही गावे ओलिताखाली येणार आहेत.