करमाळा पंचायत समिती हॉलमध्ये ‘कृषी दिन’ कार्यक्रम उत्साही वातावरणात साजरा..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : “कृषी दिन” हा कार्यक्रम राज्य शासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग संयुक्त विद्यमाने पंचायत समिती हॉल करमाळा येथे मोठा दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत संशोधन केंद्र जेऊर येथील प्रभारी अधिकारी डॉ विकास लोंढे, तालुका कृषी अधिकारी करमाळा संजय वाकडे, मंडळ कृषी अधिकारी काशिनाथ राऊत, मंडळ कृषी अधिकारी, देविदास चौधरी ,मंडळ कृषी अधिकारी करमाळा अनिल चव्हाण, पंचायत समिती कृषी अधिकारी देवा सारंगकर सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी हनुमंत यादव व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी बंधू आणि महिला उपस्थित होत्या.
सन 1989 पासून महाराष्ट्र शासनने स्वर्गीय वसंतराव नाईक महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री यांची जयंती “कृषी दिन “म्हणून साजरा करण्याची घोषणा केली, तेव्हापासून शासनाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये कृषी दिन साजरा करण्यात येतो. याप्रमाणे पंचायत समिती करमाळा येथे तालुका कृषी अधिकारी करमाळा व पंचायत समिती कृषी विभाग करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विकास लोंढे व संजय वाकडे त्यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये संजय वाकडे तालुका कृषी अधिकारी यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकांमध्ये त्यांनी कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर उमाकांत जाधव कृषी पर्यवेक्षक यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्याबाबत उपस्थित अधिकारी कर्मचारी व शेतकरी बांधवांना माहिती सांगितली. हनुमंत यादव यांनी सेंद्रिय शेती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर कृषी विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रति मंडळ दोन कर्मचाऱ्यांचे कृषी विभागाचे प्रतीक आंब्याचे रोप आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मागील खरीप आणि रब्बी हंगामामध्ये कृषी विभागामार्फत आयोजित केलेल्या पीक स्पर्धे मधील पिक वाईज विजेत्या शेतकऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कृषी विभागाचे प्रतीक आंब्याची रोप आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सत्कर कार्यक्रमा नंतर हरी दळवी श्रीमती सुप्रिया शेलार श्रीमती रोहिणी सरडे यांनी तर पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले यामध्ये कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी श्री संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी यांचे सत्कार बद्दल आभार मानून पुढील वर्षीही आम्ही उत्कृष्टपणे कार्य करून जास्तीत जास्त योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचू अशी ग्वाही दिली. शेवटी अध्यक्षीय भाषणात डॉ विकास लोंढे यांनी आपत्कालीन पीक व्यवस्थापन, हवामान अंदाज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंचायत समितीचे कृषी अधिकारी देवा सारंगकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय बागल, आत्मा गट तांत्रिक व्यवस्थापक सत्यम झिंजाडे, सहाय्यक गट तांत्रिक व्यवस्थापक, डी, आर. पोळ यांनी सहकार्य केले.