करमाळा तालुक्यात 152 व्दिशिक्षिकी शाळा – पुरेशा शिक्षकाअभावी गुणवत्तेवर परिणाम…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद मार्फत चालविल्या जात असलेल्या २२६ शाळापैकी १५२ शाळा या द्विशिक्षिकी शाळा आहेत. पहिली ते चौथी पर्यंत असलेल्या वर्गात दोनच शिक्षक कार्यरत असल्याने संबंधित शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त शिक्षक नेमण्याचा निकष बदलावा व शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात, अशी मागणी पालकातून केली जात आहे.
करमाळा तालुक्यात एकूण २२६ शाळा असून या शाळेची मंजुर पदा पैकी शिक्षकांची ६४ पदे, ४२ मुख्याध्यापिका पैकी ५ पदे, १३१ विषय शिक्षकापैकी २७ पदे रिक्त आहेत. याशिवाय तालुक्यातील १७ च्या १७ केंद्रप्रमुखाची पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत १५२ शाळा या द्विशिक्षिका असल्याने संबंधित शिक्षकांची तारांबळ उडत आहे.
१ ते ४ वर्गाची जबाबदारी त्यात एका शिक्षकावर मुख्याध्यापक पदाचा कार्यभार, तसेच प्रशासकिय कामाची जबाबदारी, दोन शिक्षकापैकी एकादा शिक्षक आजारी किंवा महत्वाच्या कामासाठी रजेवर गेल्यास एकाच शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून प्रशासना पर्यंतची कामे करणे अवघड असते. अशा स्थितीत चार-चार वर्गाच्या विद्यार्थ्यांना काय शिकविणार ? हा खरा प्रश्न आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने द्विशिक्षकीय शाळांची ही कोंडी सोडवून नियमात बदल करून जादा शिक्षक नेमावेत, अशी पालकांची मागणी आहे.