मामा.. आणखी जोर हवाय! - Saptahik Sandesh

मामा.. आणखी जोर हवाय!



साधारणपणे राज्यातील विधानसभा मतमोजणीला पहिल्या दहा फेऱ्या झाल्या, की निकालाचा कल कळतो. त्यानंतर मतमोजणी कक्षात थांबण्याची गरज नसते पण करमाळा हा एकमेव मतदार संघ असा आहे, की शेवटच्या क्षणापर्यंत कोण निवडूण येईल हे सांगता येत नाही. सन २०१४ ला आणि सन २०१९ ला अगदी शेवटच्या फेरीत निकालाचे चित्र बदलल्याचे दिसून आले. सन २०१९ च्या निवडणूकीच्या मतमोजणीच्या १७ व्या फेरी पर्यंत नारायण आबा पाटील हे संजयमामा शिंदे यांच्यापेक्षा २४४५२ मत्ताधिक्यांनी आघाडीवर होते. त्यानंतर शेवटच्या सात फेऱ्यात चित्र बदलत गेले आणि संजयमामा यांनी माढा तालुक्यातील ३६ गावाच्या जोरावर मुसंडी मारली. त्यांनी २४४५२ मताचे लिड तर तोडलेच पण ते ५४९४ मतांनी विजयी झाले. त्यामुळे संजयमामा यांना करमाळा मतदारसंघाची आमदारकी मिळाली.

एका जिद्दी व धडपड्या प्रतिनिधीकडे आमदारकी आली तसे पहाता मिळालेली ही दुर्मिळ अशी संधी आहे. पण मामा यांच्या आमदारकीचा प्रारंभ होतो ना होतो तो पर्यंत कोरोनाचे संकट आले. त्यात जवळपास दीड वर्षेसर्वांचीच वाया गेली. त्यानंतर कामकाज सुरू होते ना होते तो पर्यंत राज्यात सत्तातरणाचे न भुतो ना भविष्यती नाट्य घडले. करमाळ्याचे आमदार संजयमामा हे विरोधातील आमदार म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले पण पुन्हा राष्ट्रवादीत फुट पडली आणि अजितदादा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री झाले. त्यामुळे आमदार शिंदे यांचे दिवस पुन्हा बदलले म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे त्यांना आता मिळालेल्या संधीचं सोनं करणं आवश्यक आहे.

या तालुक्यातील मतदार तसा हुशार आहे, चाणक्ष आहे. संधी देण्याबाबत तो कधीही मागे रहात नाही पण संधी देवूनही काहीच केले नाहीतर तो अनामत रक्कमही जप्त करायला मागे पुढे पहात नाही आणि काम करणाऱ्याला भरभरून मतदान केल्याशिवाय रहात नाही. सन २०१९ चे माजी आमदार नारायण आबांना जे भरघोस मतदान झाले त्यातून हे स्पष्ट झाले आहे. मुळातच हा तालुका विकासाच्या किनाऱ्यावर येवून ठेपलेला आहे. आमदार शिंदे यांच्या दृष्टीने ती बाब अत्यंत महत्वाची आहे. पाडाला आलेले फळ चाखायला वेळ लागत नाही. याप्रमाणे तालुक्यातील बहुतेक कामे पाडाला आलेली आहेत.

दहीगाव उपसा सिंचन योजनेचे काम झाले पण उपचाऱ्या नाहीत. थोडा जोर दिला तर ते काम लवकर पुर्ण होऊ शकते, त्याला निधीही आला आहे. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आलेले पाणी शेतात गेलेतर त्याचे श्रेय अर्थातच मामांना जाणार आहे. कुकडीचे पाणी टेल टू हेड दिले जात नाही. काही चाऱ्या व उपचाऱ्याची कामे राहिलेली आहेत. ती कामे आता शक्य नाही. त्यामुळे मामांनी हे पाणी उजनीत टाकून ते उचलून पोंधवडी चारी पर्यंत कुकडीच्या कॅनॅलमध्ये आणून राहिलेले क्षेत्र बागायत करण्याचे धोरण आखले आहे. ते धोरण प्रत्यक्षात राबवले पाहिजे व त्यासाठी पैसे मिळवून या योजना परिपुर्ण करण्याची गरज आहे. कुकडीचे पाणी मांगी प्रकल्पात आणण्याची मोठी आवश्यकता आहे. यासाठी मामांनी हे पाणी थेट पाईप लाईन व्दारे आणण्याचे धोरण जाहीर केले आहे. किंवा पोंधवडी चारीतून येणारे पाणी हे सुध्दा मांगी तलावात आणले जावू शकते पण मांगीसाठी राखीव पाणी ठेवण्याची गरज आहे. एक टी. एम. सी. पाणी राखीव ठेवू असे अनेकांनी सांगितले पण तसा निर्णय कधीच झाला नाही. ते काम मामांनी केलेतर लाभार्थी त्यांना कायम स्मरणात ठेवतील.

तालुक्यामध्ये वीजेचा अजुनही प्रश्न आहे. काही उपकेंद्रांची व अनेक डिपीची गरज आहे. त्यासाठी वरीष्ठ पातळीवर लढावे लागणार आहे .तालुक्यातील काही रस्ते झाले पण काही रस्ते अजुनही होण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करावा लागेल त्याशिवाय तालुक्यातील रस्त्याची स्थिती सुधारणार नाही. पुर्नवसन भागातील गावातील रस्ते दुरुस्तीसाठी विशेष व वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. तालुक्यातील पाणी पुरवठा योजना वीज बिल, कर्मचारी पगार यामुळे बंद पडल्या आहेत. दुष्काळात शासन या योजना चालवते नंतर त्या योजना बंद पडतात. कोर्टीसह १२ गावाची योजना, जेऊर सह २९ गवाची योजना त्या सध्या बंदच पडल्या आहेत. त्यामुळे शासनाचे करोडो रूपये वाया गेले असून, , नागरिकांना पाण्याअभावी धावपळ करावी लागते. त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या बरोबरच रुग्णासाठी अद्यायावत रुग्णालय आवश्यक आहे, शंभर खाटाचे उपजिल्हारूग्णालय झाले पण तिथे यंत्रसामुग्री पाहिजे, तसेच काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. आजही थोडा क्रिटीकल पेशंट गेले, की हे लोक त्याला थेट सोलापूरला पाठवण्यासाठी गडबड करतात, मग त्या शंभर खाटाचे दवाखान्याचे करायचे काय..? तसेच या तालुक्यात कृषी महाविद्यालय, तंत्रज्ञान व उच्च शिक्षण सुविधा नाहीतच, त्यासाठी तालुक्यातील मुलांना बाहेर जावे लागते. शिक्षणासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज आहे.
गेल्या २५ वर्षापासून करमाळा एम.आय.डी.सी.चे काम रेंगाळले आहे. फार काही नाही पण संबंधित अधिकाऱ्याच्या मागे लागलेतर व नवीन उद्योजकांना आमंत्रित केलेतर तालुक्याचे हे स्वप्न पुर्ण होऊ शकते. त्यामधून बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकते. संजयमामांना ते काम करावे लागेल.कोळगाव प्रकल्पाची राहिलेली कामे, सहकार क्षेत्रातील कामे, अशी अनेक कामे असलीतरी महत्वाच्या कामावर लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे डिकसळ पुलाचे काम अनेक वर्षापासून रेंगाळले होते ते आमदारांनी मंजूर करून त्याचा निधी आणला तशी कामे होणे गरजेचे आहे.

आमसभा म्हणजे तालुक्यातील परिस्थितीचा आरसा असतो. मामांनी अद्याप आमसभा बोलावली नाही. लोकांचे प्रश्न कसे समजणार..? अधिकारी मुजोर झाले हे लोकप्रतिनिधीला कसे कळणार..? त्यामुळे आमसभा बोलावलीच पाहिजे. ना तालुक्याला गेल्या अनेक महिन्यापासून पुर्णवेळ तहसीलदार नाही,न.पा. चे. मुख्याधिकारी नाही; महत्वाचे निर्णय कोण घेणार, तातडीची कामे कशी होणार..? शिक्षकापासून ते विस्तार अधिकारी, तालुका भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यापासून ते पशुचिकित्सालय, ग्रामसेवक, गावकामगार तलाठी, जिल्हा रुग्णालय अशा कार्यालयातील अनेक मोक्याच्या जागा रिक्त आहेत. ती पदे भरली पाहिजे. बेरोजगारासाठी सुतगिरणी, होजीअरी उद्योग उभारणीबाबत प्रयत्न होण्याची गरज आहे. तालुक्यात दोन सहकारी व दोन खाजगी कारखाने आहेत. या कारखान्याला ऊस देणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे करोडो रूपये कारखानदारांनी अद्याप दिले नाहीत. बाहेरचे कारखान्यांनी तीन तीन हाप्ते दिले एफआरपी पेक्षा जास्त दर दिले पण येथे मुळ पेमेंट दिले नाही. यासाठी आमदार शिंदे यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. अधिकारी भ्रष्टाचार करतात यासाठी वेगळे सांगण्याची गरज नाही. पोलीस, महसूल, कृषी, भूमी अभिलेख विभागात दिवसा ढवळ्या गरजवंताचे खिसे कापले जातात, याकडे कोण पाहणार..? एजंटाला पुन्हा एकदा चांगले दिवस येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यातल्या व तालुक्यातल्या महत्वाच्या कामाबरोबरच याबाबीकडे आमदार शिंदे यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

✍️डॉ. अ‍ॅड. बाबूराव हिरडे, करमाळा, मो.९४२३३३७४८०

प्रिंट पेपर मधील अग्रलेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!