” कधी न सोडलेल्या सेवेचा प्रवास…”
“जिथं हृदयात प्रेम अन् डोळ्यांत करूणा,
तिथं उगम होते खऱ्या माणुसकीची प्रेरणा..!”

करमाळा नगरपालिकेतील एक तेजस्वी, समर्पित, आणि मनापासून कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजे आदरणीय स्वातीताई रामकृष्ण माने. त्यांच्या जीवनात यंदा एक अद्भुत योगायोग आला आहे — २१ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस, आणि अवघ्या दहा दिवसांत ३१ जुलै २०२५ रोजी त्यांची सेवानिवृत्ती. आयुष्यभर समाजासाठी झिजलेल्या या मातृवत व्यक्तिमत्त्वाच्या जीवनप्रवासाचा हा एक सुवर्णक्षण आहे, ज्यात त्यांची झेप, त्याग, आणि सेवा ह्यांचं कौतुक करणं, हा आपल्यासाठी सन्मान आहे.
स्वातीताईंचा जन्म औरंगाबाद (संभाजीनगर) येथील एका चळवळीतल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील आसाराम गुरुजी हे भटक्या विमुक्त समाजातील एक धडपडणारे, सामान्य माणसांसाठी लढणारे दीपस्तंभ होते, आणि त्यांच्या आई “वेणूबाई” यांनी प्रेमळ, शिस्तबद्ध आणि माणुसकीची बीजे स्वातीताईंच्या मनात रोवली. संभाजीनगरमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, वसंतराव नाईक महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. पुढे २ जून १९९१ रोजी त्यांचा विवाह करमाळ्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि भटक्या विमुक्त जाती जमाती आदिवासी ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक माजी नगरसेवक रामकृष्ण माने यांच्याशी झाला.

त्यानंतर त्यांनी करमाळा ही आपली कर्मभूमी मानली.
सुरुवातीला महात्मा फुले समाजसेवा मंडळात त्यांनी बालवाड्यांतील मुले शिकवणं, महिलांच्या गटात काम करणं, मेळावे आयोजित करणं, मार्गदर्शन करणं अशी कामं स्वीकारली. घरी शिलाई काम, किराणा दुकान चालवलं,त्या काळात माने भाऊ आदिनाथ कारखान्यावर सुरक्षा अधिकारी म्हणून नोकरी करत होते, पण त्यांनी ती नोकरी सोडून संपूर्णपणे सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं आणि त्यांना स्वातीताईंचं बळ लाभलं.
स्वातीताईंना ‘एम्प्लॉयमेंट एक्सेंज’मधून नोकरीची संधी मिळाली तात्कालीन नगराध्यक्ष गिरधरभई देवीच्या कालावधीत, डिसेंबर १९९३ मध्ये त्या करमाळा नगरपालिकेत ‘क्लार्क’ म्हणून रुजू झाल्या. त्या दिवसापासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. सार्वजनिक योजनांमध्ये, विशेषतः संजय गांधी निराधार योजना, महिला सक्षमीकरण, नागरिकांच्या अडचणी, गरजूंसाठी सेवा या सर्व बाबींमध्ये त्यांनी प्रामाणिक आणि पारदर्शक कार्य केलं. “लाच घेणार नाही, खाऊ देणार नाही” हे त्यांचं जीवनमूल्य ठाम होतं. त्या मूल्यांमुळे त्यांना त्रासही झाला, पण त्यांनी कधीही आपल्या तत्वांना तडा जाऊ दिला नाही.
सन१९९९ मध्ये त्यांनी आणि रामकृष्ण माने भाऊंनी मिळून ‘भटक्या विमुक्त जाती-जमाती आदिवासी ज्ञानपीठ’ या संस्थेची स्थापना केली आणि त्यातून ‘एकलव्य आश्रमशाळा’ सुरू झाली. ही संस्था आज शेकडो विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, संस्कार आणि सुरक्षित आश्रय बनली आहे. त्या या संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.या शाळेतील प्रत्येक लेकराला त्यांनी आईसारखं प्रेम दिलं आहे.

एकीकडे नगरपालिकेतील नोकरी, दुसरीकडे संस्थेचं व्यवस्थापन, त्यासोबत महिलांच्या क्षितीज ग्रुपमध्ये काम आणि घरची जबाबदारी, या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी समतोल साधत पार पाडल्या. या साऱ्या धावपळीच्या काळात त्यांनी आपली कन्या क्रांती हिला बी.एस्सी. (अॅग्रीक्लचर) नंतर एम.एस्सी. (इकॉनॉमिक्सपर्यंत) शिकवलं, आणि पुत्र संग्राम याला “ॲडव्होकेट “म्हणून घडवलं. आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करत त्यांना समाजासाठी उपयुक्त बनवलं.
त्यांच्या सेवाकाळात त्यांना पदोन्नती किंवा केडरमध्ये जाण्याची संधी होती. पण त्यांनी ती संधी नाकारली. कारण बदली होऊ नये, संस्था आणि करमाळा सोडावं लागू नये म्हणून त्यांनी क्लार्क पदावरच समाधान मानलं. ही त्यांची केवळ नम्रता नव्हे, तर समाजाशी असलेली निष्ठा होती.
आज त्या ३२ वर्षांची सेवा पूर्ण करून ३१ जुलैला सेवानिवृत्त होत आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचा वाढदिवस अगदी त्या आधी २१ जुलै रोजी येतो आहे. या दोन तारखा त्यांच्या आयुष्यातील दोन तेजस्वी वळणं आहेत – एक नव्या अध्यायाची सुरुवात आणि दुसऱ्या अध्यायाचा यशस्वी समारोप. त्यांच्या कार्याचे स्मरण हे करमाळा नगरपालिकेसाठी आणि येथील जनतेसाठी सदैव प्रेरणादायक ठरणार आहे.
स्वातीताई म्हणजे करमाळा नगरपालिकेतील केवळ एक कर्मचारी नव्हे, तर महिला सक्षमीकरणाची एक मूर्तिमंत प्रेरणा आहेत. त्यांनी केवळ नोकरी केली नाही, तर समाजाच्या हृदयात आपली जागा निर्माण केली.
तुमचं आयुष्य म्हणजे चालतं श्रद्धास्थान, आणि कार्य म्हणजे एक अढळ दीपज्योत…!
“पद नसलं तरी प्रभाव आहे,
संघर्ष असला तरी, समर्पण प्रखर आहे…
म्हणूनच तुम्ही ‘ताई’ नव्हे, तर करमाळ्याच्या अंतःकरणात ‘माई’ आहात!”
💐डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे,
करमाळा.मो.न. 9423337480💐