कृषी पंढरीचा वारकरी – धुळाभाऊ कोकरे

पांढरे शुभ्र धोतर, तीन गुंठ्याचा शर्ट, डोक्यावर कडक टोपी आणि पायात काळा बूट… सहजपणे ताडताड चालणाऱ्या या व्यक्तिमत्वाचं नाव आहे धुळाभाऊ कोकरे. कुगाव (ता. करमाळा जि. सोलापूर) येथील ते एक आदर्श, विज्ञानवादी व दूरदृष्टी असलेले शेतकरी आहेत. संपूर्ण कुटुंबाची आणि परिसराच्या शेतीत परिवर्तन करणारे ते एक शिल्पकार आहेत. वास्तविक पाहता श्रम, शिस्त, आणि समाजाभिमुखतेचा आदर्श पाळणारे ते एक नामवंत शेतकरी नव्हेतर ते खऱ्या अर्थानं “कृषी पंढरीचे वारकरी” आहेत.

ग्रामीण भागात राहूनही विज्ञानवादी दृष्टीकोन जपणारे कोकरे कुटुंब आज आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि संपन्न दिसत असलेतरी आहे, या यशामागे खूप संघर्ष आहे. धुळाभाऊंच्या लहानपणी जमीन होती पण आर्थिक संपन्नता नव्हती.त्यांच्या बऱ्याचशा जमिनी उजनी जलाशयात गेल्या होत्या . उरलेल्या जमीनी माळरानाच्या होत्या. धुळाभाऊंनी या परिस्थितीवर कष्ट आणि दूरदृष्टीतून मात केली. त्यांनी अडचणीत संधी शोधली. सुरवातीपासूनच जमेल ती पीके व नंतर ऊसाची शेती सुरू केली. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून जमेल तशा जमीन खरेदी करण्यास सुरुवात केली.

त्यांच्या लक्षात आलं होतं की, जमिनीच्या किंमती भविष्यात नक्कीच वाढणार आहेत, म्हणून त्यांनी प्रथम जमिनी खरेदी करण्यावर भर दिला. त्यामुळेच आज कोकरे परिवाराकडे कुगाव, उमरड, आणि उंदरगाव या तीन गावांमध्ये शेकडो एकर शेती आहे. जेंव्हा जमिनीची किंमत वाढल्या त्यानंतर त्यांनी त्या जमिनी पुर्णपणे विकसित करण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केलं. प्रारंभी ऊस , नंतर केळीचे उत्पादन घेत आणि त्यासोबत फळबागा, नारळ, आंबा, चिकू अशा झाडांची लागवड करून उत्पादन वाढवले.

याच प्रक्रियेतून त्यांनी ‘कोकरे आयलँड ’ नावाचं सुंदर कृषी पर्यटन केंद्र उभारलं. उजनी बॅकवॉटरच्या निसर्गसंपन्न किनाऱ्यावर त्यांनी बोटिंगसह सुंदर सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळेच पर्यटकांना आकर्षित करणार्या “कोकरे आयलँड ” हे आदर्श पर्यटनस्थळ झाले आहे.
धुळाभाऊ कोकरे हे कुटुंबप्रमुख म्हणून अत्यंत कुशल आहेत. एकत्र कुटुंब व्यवस्थेचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. पहाटे उठून स्वतः शेतात काम करतात, दिवसभराचं नियोजन करतात, कामाची योग्य विभागणी करतात आणि नंतर इतर दौरे – ही त्यांची दिनचर्या आहे.

त्यांची दोन्ही मुलं शासकीय अधिकारी आहेत, भावंडांची मुलं वकील, व्यावसायिक, उच्च शिक्षण घेतलेली आहेत. कुटुंब वेगवेगळ्या क्षेत्रात असलं तरी एक विचार, एक ध्येय, एकसंघपणा हीच त्यांची खरी ताकद आहे.राजकारणातही त्यांचा प्रभाव मोठा आहे. गावापासून तालुक्यातील महत्त्वाच्या सत्ता त्यांच्याकडे असतात पण ते कधीही सत्तेचा गर्व करत नाहीत. दादागीरी हा शब्द त्यांच्या परिवारात औषधालाही नाही.ते सत्तेत असोत वा विरोधात, त्यांचा सर्व गटांच्या नेत्याशी आपुलकीचा संबंध आहे. गावच्या राजकारणात त्यांनी कधीही भांडणं, भेदभाव, अहंकार याला थारा दिला नाही. या उलट “आपल काम भले आणि आपण भले” हे धोरण राबवले. कुगाव ते शिरसोडी हा उजनीवरील मोठा पुल कोकरे परिवाराने घेतलेली मेहनत व पाठपुरावा याला मिळालेले यश आहे.

शेतीच्या क्षेत्रात त्यांनी वेळोवेळी केलेले उपक्रम हे प्रयोग नसून इतरांसाठीही उपक्रम ठरले आहेत. शेती, पर्यावरण आणि विज्ञान या साऱ्यांचा समन्वय साधत त्यांनी एक स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
त्यांच्या शेतीच्या उल्लेखनीय कामाचा आलेख पाहीला असता, त्यांनी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर करून हवामानाचा अंदाज, पीक आरोग्य, खत वापर नियोजन, कीड व्यवस्थापन केले आहे.

१००% ड्रिप सिंचन,सेन्सर तंत्रज्ञान वापरून मातीची स्थिती, आर्द्रता, तापमान, खताची गरज पाहून वापर केलेला आहे. त्यांची केळी उच्च प्रतीची आणि निर्यातक्षम असून ती परदेशात निर्यात होतात. त्याबरोबरच उसाचं विक्रमी उत्पादन हे कोकरे परिवाराचे वेगळेपण आहे. बांधांवर आंबा, नारळ, चिकू, यासारख्या बहुपीक झाडांची लागवड करून पारंपरिक संवर्धन आणि आर्थिक शाश्वत शेतीचा मार्ग काढलेला आहे.उजनी बॅकवॉटरच्या किनाऱ्यावर वाघमोडे यांच्या सहकार्यानं बोटिंग सुविधा सुरू केली. त्यामुळेच त्यांच्या शेतात शाळा, महाविद्यालये आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी येतात. या सहलींना शासनाची अधिकृत मान्यता आहे. या उपक्रमांतून स्थानिकांना रोजगार, पर्यावरण संवर्धन व कृषीची जनजागृती वाढली आहे.
धुळाभाऊ कोकरे यांचं जीवनकार्य हे शेतीच्या क्षेत्रातील खर्या अर्थाने एक प्रेरणादायी आदर्श आहे. पारंपरिक शेतीच्या चौकटी ओलांडून त्यांनी विज्ञानाधिष्ठित, तंत्रज्ञानावर निर्यातक्षम आणि पर्यटनक्षम शेती मॉडेल उभं केलं आहे. म्हणूनच त्यांना नुकताच “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन….
✍️ डाॅ. ॲड. बाबूराव हिरडे, करमाळा.मो.न. 9011355389
प्रगतशील शेतकरी धुळाभाऊ कोकरे यांना ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार’ प्रदान

–
