करमाळा तालुक्यात ‘गाव तिथे शाखा’ मोहिमेने शिवसेना बळकट करणार – जयवंतराव जगताप

करमाळा(दि. 8): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन विचारपूर्वक शिवसेनेत प्रवेश केला असून “गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक” ही मोहीम राबवून करमाळा तालुक्यात शिवसेना मजबूत करणार, असे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.

ते तुळशी वृंदावन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात सहा फुटी विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, शिवसेना शाखा उद्घाटन, धर्मवीर आनंद दिघे वाचनालय उद्घाटन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून उभारलेल्या सिद्धार्थ आधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी त्यांनी युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रातील प्रेरणादायी दाखले देत सशक्त व सुदृढ महाराष्ट्र व देश घडविण्याचे आवाहन केले. तसेच तालुक्याचे प्रश्न मंत्रालय स्तरावर सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे काम पाहत असल्याने अडचण येणार नसल्याचे सांगितले.

जगताप यांनी पुढे सांगितले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढवल्या जातील. करमाळा तालुक्यातून २५ हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवून महिनाभरात काम पूर्ण करण्यात येईल.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, जगताप यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील शिवसेना अधिक बळकट झाली आहे. त्यांचे दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून नाव आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा विजय निश्चित आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन अब्दुले यांनी केले तर आभार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी मानले.


