तलवार घेऊन दहशत माजवणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात..

करमाळा : भगतवाडी (ता. करमाळा) येथे 7 ऑगस्टला सकाळच्या सुमारास तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ कारवाई करून ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याची फिर्यादी पोलीस नाईक मनोज भिमराव सोनवणे यांनी दिली आहे. ते म्हणाले, की 7 ऑगस्ट ला सकाळी ६.१५ च्या सुमारास भगतवाडी येथील रहिवासी सचिन संदीपान गिरंजे (वय ३०) यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली की, त्यांच्या घराजवळ सुभाष उर्फ अण्णा नारायण जाधव (रा. भगतवाडी) हा तलवार घेऊन दहशत माजवीत आहे.

सदर माहिती मिळताच पोलीस नाईक सोनवणे, पोसई बनकर, हवालदार ढेंबरे , राठोड व पोलीस कर्मचारी गोसावी हे खाजगी वाहनाने तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तेथे पाहणी केली असता संशयित सुभाष जाधव हा हातात तलवार घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्याच्या हातातील तलवार काढून घेत त्याला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले. सदरची तलवार जप्त करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

