तापमान वृद्धी – एक समस्या
यावर्षी महाराष्ट्रामध्ये तापमान वाढीने उच्चांक गाठला आहे त्यामध्ये आपला सोलापूर जिल्हा काही पाठीमागे नाही रोज 42 ते 43 डिग्री तापमानाला सोलापूरकरांना सामोरे जावे लागत आहे. तापमान वाढीची कारणे व त्याचे मानवी जीवनावर तसेच पर्यावरणातील जीवसृष्टीवर होणारे परिणाम जाणून घेणं आवश्यक आहे .विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, मानवाचा श्वास आणि ध्यास बनली. आपले जीवन अधिक सुखकर व्हावे, यासाठी सारा अट्टाहास. या अट्टाहासापोटी मानवाने निसर्गाला ओरबाडणे सुरू केले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीने ऊर्जेची गरज वाढवली. वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अर्थातच इंधनाची गरज वाढली. इंधन जाळून ऊर्जा मिळवली जाऊ लागली. ऊर्जा मिळवताना जे इंधन जाळले जाते, त्यातून कार्बनडाय ऑक्साइड वायू आणि हरित गृह वायू तयार होऊ लागले. त्यातून पृथ्वीचे तापमान वाढू लागले. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे पावसाच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल झाला. त्याचे वागणे बदलले. कोठे महापूर तर कोठे दुष्काळ, कोठे ढगफुटी तर कोठे पिकांवर रिमझीम पाऊस पडल्याने रोगांची भीती. याचा परिणाम शेतीवर झाला. पाऊस अनियमीत झाला आणि पीक काढणीला आले की मात्र नियमीत पडू लागला. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले जाते. जवळपास दरवर्षी पीक काढणीच्या वेळी हमखास पाऊस पडून पिकलेल्या पिकाला आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील, मनातील स्वप्नांना तो मातीत मिसळतो. मात्र जागतिक तापमान वाढीचा परिणाम केवळ मानवी जीवनावर होतो असे नाही तेव्हा इतर जीवानांही त्याची झळ लागत आहे. इतर सजीवांच्या त्यातही पक्षी आणि प्राण्यांच्या जीवनावरही मोठा परिणाम होऊ लागला आहे. जागतिक तापमान वाढ झाल्याने जगभर पाण्याची उपलब्धता कमी झाली.
भूतकाळातलं तापमानाचं स्वरूप सध्याच्या तापमानाच्या स्वरूपापेक्षा निराळं होतं. काही ठिकाणी जास्त तापमान तर काही ठिकाणी अगदी कमी असं ते होतं.पण सध्या जी तापमानवाढ होत आहे ती खूप जलदगतीने होत असल्याचं दिसत आहे. नैसर्गिक घटनांमुळे होणाऱ्या तापमानवाढीचं प्रमाण हे मानवनिर्मित घटनातून होणाऱ्या तापमान वाढीपेक्षा जास्त झालं आहे. म्हणजेच निसर्ग बेभरवशाचा झाला आहे. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर वायूमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान वाढते त्याला हरितगृह परिणाम म्हणतात, तर या वायूंना हरितगृह वायू म्हणतात.
वातावरणाच्या थरांवर सूर्यकिरणे पडतात. वातावरणाचे थर सूर्यकिरणांना शोषून घेतात किंवा ते उत्सर्जित होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सूर्यकिरणं हरितगृह वायू शोषून घेतात किंवा पुन्हा उत्सर्जित करतात. याच सौरऊर्जेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापतं. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचं तापमान 30 अंशांनी कमी असलं असतं आणि जीवसृष्टीसाठी ते घातक ठरलं असतं. नैसर्गिक ग्रीनहाऊस परिणामाबरोबरच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातून उत्पन्न होणाऱ्या वायूंचे उत्सर्जन होत आहे त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. यालाच जागतिक तापमान वाढ किंवा हवामान बदल म्हणतात.
ग्रीनहाऊस गॅसेसमुळे होणाऱ्या तापमानवाढीत सर्वाधिक वाटा हा पाण्याच्या वाफेचा असतो. पण हा परिणाम काही दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. पण त्याच तुलनेत कार्बन डायऑक्साईड, गॅसेस वातावरणात जास्त दिवस टिकतात. हा परिणाम पूर्णतः जाण्यासाठी किंवा औद्योगिक क्रांतिपूर्व अवस्था येण्यासाठी काही शतकं लागू शकतील. कार्बनडायऑक्साईड समुद्र शोषून घेतो आणि याचा परिणाम समुद्री जीवसृष्टीवर होतो. काही लोक असं म्हणतात की जागतिक तापमानवाढ किंवा हवामान बदल असं काही नसतं. पण ती गोष्ट आहे याचे पुरावे वैज्ञानिकांनी दिले आहेत. गेल्या शंभर वर्षांत पृथ्वीचं सरासरी तापमान 0.8 डिग्रीनं वाढलं आहे आणि यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या तीन दशकातच 0.6 डिग्रीनं तापमान वाढलं आहे.
अलीकडच्या दशकात सागरी पातळीत वाढ झाली आहे. उष्णतेमुळे पाण्याचं प्रसरण होतं त्यातून ही पातळी वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होईल. अन्नधान्य निर्मितीच्या प्रक्रियेत बदल होईल. नैसर्गिक आपत्ती जसं की पूर, वादळं, दुष्काळ उष्ण वाऱ्याच्या लहरीत होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढेल. तापमान बदलामुळे निसर्ग लहरी होईल . येणाऱ्या काळात पर्जन्यमान वाढू शकतं पण त्याचबरोबर उन्हाळ्यात दुष्काळ पडण्याची भीती देखील जास्त राहील यावर्षीच्या उन्हाळ्यात याची चाहूल लागली आहे. समुद्राची पातळी वाढणं आणि वादळांमुळे पुराची स्थिती नेहमी तयार होऊ शकते.
प्राणी आणि वनस्पतींची निसर्गातील बदलाशी जुळवून घेण्याची जी क्षमता आहे त्याहून तीव्र गतीने बदल होताना दिसतील. त्यामुळे वन्य पशू आणि वनस्पतींच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. मलेरिया, दूषित पाण्यामुळे निर्माण होणारे आजार आणि कुपोषणामुळे लाखोंच्या संख्येनं बळी जाऊ शकतात . कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात वाढ झाली तसं समुद्रातल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे समुद्राचं आम्लाचं प्रमाण वाढलं आहे. हे आम्ल वाढल्यामुळे समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे या सर्व समस्यावर मात करायची असेल तर मानवाने कमी कष्टामध्ये चांगल्या सुविधा मिळण्यासाठी विविध तंत्रज्ञानचा वापर करून दैनंदिन गरजा पूर्ण करत असताना पुढच्या पिढीला देखील निसर्गातील स्रोत शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.
– प्रा. धनंजय पन्हाळकर,९४२३३०३७६८ जिल्हा देवगड.