डेमोक्रॅटिक किंग

आधुनिक महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उद्धारासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता तडजोड न करता आयुष्याच्या अखेरपर्यंत झटणारे थोर राष्ट्रपुरुष म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होय.
२६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथील ( कागलच्या घाटगे घराण्यात) त्यांचा जन्म झाला त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. १८९४ साली वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती घेऊन राजे कायदेशीर वारसदार बनले तेव्हापासूनच वेठबिगारीची पध्दत बंद करुन राजांनी अब्राह्मणांना संस्थानात नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
पिढ्यानपिढ्या ज्यांना अस्पृश्य लेखून त्यांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, अशा सर्व स्तरातील हक्क अधिकार इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारले होते, अशा वंचित, उपेक्षित, शोषित, बहुजन समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कायदेशीर सामाजिक समानता प्रस्थापित करणे आवश्यक आहे हे जाणून घेऊन राजर्षी शाहू महाराजांनी १९१६ साली कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश देऊन १९१७ साली कायदा करुन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. तसेच या विविध जाती धर्मातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांची गरज ओळखून शालेय शिक्षण सोयीस्कर व्हावे या हेतूने विविध वसतिगृहांची स्थापना देखील केली. त्यामधे राजाराम हॉस्टेल (१९०१) व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग (१९०१) वीरशैव लिंगायत बोर्डिंग (१९०६) मुस्लिम बोर्डिंग (१९०६) नामदेव बोर्डिंग (१९११) अशी विविध वसतिगृह स्थापन केली.
सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने जुलै १९१७ मधे पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत केला,१९१८ साली आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत केला, बलुतेदारी पध्दत बंद करुन जून १९१८ साली कुलकर्णी व महार वतने रद्द करुन संस्थानात तलाठी शाळांची स्थापना केली. १९११ साली कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करुन महात्मा फुलेंच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सुधारणांचा गौरव करुन खऱ्या अर्थाने त्यांचा वारसा जपण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले.स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा संमत केला, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राधानगरी हे धरण वसविले तसेच शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी बलभीम को- ऑपरेटिव्ह या सहकारी सोसायट्यांची स्थापना केली त्यामुळे शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला.
वेदोक्त प्रकरणात महाराजांचा पुरोहित नारायण भट पूजा अर्चेच्या वेळी वेदोक्त ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असे,वैदिक मंत्र हे केवळ क्षत्रियांसाठी असून महाराज क्षेत्रिय नाहीत अशी मनुवादी विचारसरणी भटांनी त्याकाळी सुध्दा दाखवली अशा कपोलकल्पित ब्राह्मणी भेदनितीला टिळकांनी राजांच्या विरोधात ब्राह्मणांची बाजू घेतली होती ही खरोखरच चिड आणणारी बाब आहे.अशा या असमानतेवर आधारलेल्या ब्राह्मणी विचारांना पायदळी तुडवून १९०५ साली राजर्षी शाहू महाराजांनी यांचे सर्व वंशपरंपरागत हक्क काढून घेऊन त्यांचे इनाम जप्त केले.व या क्षात्रजगतगुरु पीठावर सदाशिवराव पाटील – बेनाडीकर या मराठा समाजातील व्यक्तीची निवड केली. पुरोहितांची शाळा काढून विविध जाती – जमातीतील नवे पुरोहित निर्माण केले.
ऑक्टोंबर १९२० साली महाराजांनी कोल्हापूरातील शंकराचार्यांचे पीठ रद्द करुन क्षात्रजगतगुरु असे नवे पीठ निर्माण केले. ब्राह्मणांची मक्तेदारी मोडीत काढून १९०२ साली राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा देशातील पहिला क्रांतीकारी निर्णय महाराजांनी घेतला. बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली, खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना केली वेगवेगळ्या बाजारपेठा स्थापन करुन बहुजन समाजाला सन्मानाने व्यापार उद्योगधंदे करुन स्वतचा उध्दार करता यावा यासाठी योजना राबविल्या. १९२० साली विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता ओळखून त्यांच्या ” मूकनायक” वृत्तपत्रासाठी आर्थिक सहाय्य केले.
मार्च १९२० मधे कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील अस्पृश्यांच्या परिषदेत भाषण करताना शाहू महाराजांनी हे उद्गार काढले होते कि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे,तुमचेच नाही तर अखंड हिंदुस्थानचे नेते होतील तेव्हा आपण सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व मान्य करण्याचे आवाहन केले होते व पुढे जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक राजकीय वैचारिक शैक्षणिक धार्मिक क्रांती घडवून महाराजांचा विश्वास सार्थ ठरविला.
अशा या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी महान कार्य केले याबद्दल सर्व जाती- जमाती, धर्मातील बहुजन बांधव महाराजांचे कायमस्वरूपी ऋणी राहतील अशा या लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना १५० व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन करून विनम्र अभिवादन करतो.
✍️ समाधान दणाने करमाळा जिल्हा-सोलापूर




