डॉक्टर मित्र – वणव्यातील गारवा!

तुम्ही कितीही मोठे असलात तरी आजारपणात हॉस्पिटलच्या दारात उभं राहिल्यावर तुमचं अस्तित्व ‘पेशंट’ या शब्दातच सीमित राहतं. त्या क्षणी राजकीय ओळखी नव्हे, तर डॉक्टर मित्राची साथ ही खरी जीवनरेषा ठरते.
“सुखी आयुष्य” जगण्यासाठी जसा एक समविचारी जोडीदार आणि चांगला शेजारी असला पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडून कोणत्याही व्यवहाराची अपेक्षा न ठेवणारा, पारदर्शक सल्ला देणारा डॉक्टर मित्र/मैत्रिण अत्यंत गरजेचे आहेत.

आपल्या आयुष्यात दोन प्रकारचे डॉक्टर असले पाहिजेत.पहिला, ज्या डॉक्टरकडे तुम्ही पैसे देऊन नियमितपणे उपचार घेता तो आणि दुसरा, जो आयुष्यभर व्यवहारापलिकडे वैद्यकीय सल्ल्यांच्या बाबतीत वाटाड्या आणि कौटुंबिक सल्लागार म्हणून अतिशय मोलाची भूमिका पार पाडेल.

‘डॉक्टर मित्र’ हा खराखुरा जीवाभावाचा मित्रच असला पाहिजे, ही महत्त्वाची अट यात आहे. ‘डॉक्टर मित्र’ म्हणजे काय तर तो तुमच्या अडीनडीला धावून येणारा, सूर्य पाहिजे तर सूर्य आणि चंद्र पाहिजे तर चंद्र आणून देणारा, वैद्यकीय क्षेत्रात चांगली पदवी, वैद्यकीय क्षेत्रात चांगले नेटवर्कींग असलेला असावा. हा मित्र तुम्हाला व्हॉट्सॅपवर प्रिस्क्रिप्शन पाठवून तुमचे आजार बरे करणारा नसेल, तर तुम्हाला एखादी वैद्यकीय अडचण आल्यावर ती सोडविण्यासाठी त्यासाठीचा योग्य मार्ग दाखवेल, चांगले डॉक्टर कोण आहेत, कोणत्या रूग्णालयात जायला हवे यासाठीचा संप्रेरक असला पाहिजे.

तुम्ही कितीही बिगशॉट असा, तुम्हाला वेळेवर मोठमोठे रेफरन्सेस कामाला येत नाहीत. कुठलीही व्यक्ती रूग्णालयाच्या दारात उभी असताना व्हिआयपी नव्हे तर पेशंट असते आणि त्यावेळी हा ‘डॉक्टर मित्र’च तुम्हाला वाचवू शकतो. मा. शरद पवार यांचे उदाहरण इथे आवर्जुन द्यावेसे वाटते. शरद पवार यांनी आपल्या आयुष्यात डॉ. रवी बापट हा ‘डॉक्टर मित्र’ कायम जपला. वेगवेगळ्या आजारांवर मात करण्यासाठी त्यांना या मैत्रीने ताकद दिली.

मला आश्चर्य वाटते की, अमुक एका रूग्णाला व्यवस्थित ट्रीटमेंट द्या, अमुक एका रूग्णाचे बिल कमी करा, अमुक एका रूग्णाला लवकर डिस्चार्ज द्या अशा विनंत्या घेऊन लोकं राजकीय नेत्यांकडे का जातात? आपल्या लोकप्रतिनिधींकडे अशा अपेक्षा घेऊन जाण्यात काहीच गैर नाही. परंतु राजकारण्यांपेक्षा एखाद्या डॉक्टर मित्राकडे अशी विनंती केली आणि त्या डॉक्टर मित्राने तुमच्यासाठी उपचार करणा-या डॉक्टरला फोन केला तर त्याचा प्रभाव नक्कीच जास्त पडेल. कारण समव्यावसायिक म्हणून त्यांचे म्हणणे एकमेकांना अधिक चांगले कळू शकते.

डॉक्टर मित्राकडून तुम्ही एकतर्फी मदतीचा अपेक्षा केली तर ते एकतर्फी प्रेम ठरेल. हा डॉक्टर मित्र तुम्हाला कसोशीने जपावा लागेल. फक्त त्यानेच तुमच्या संकटकाळात उभे राहायचे अशी अपेक्षा ठेवून चालणार नाही. त्याच्या आयुष्यात तुमची तीच भूमिका असली पाहिजे जी तुमच्या आयुष्यात त्याची डॉक्टर म्हणून आहे. दोघांची मैत्री समसमान असायला हवी. म्हणजेच मैत्रीत तुम्हाला पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘नारायण’ व्हावे लागेल. व्यवहार बाजूला ठेवून त्याच्या संकटकाळी धावून जावे लागेल.

सांगण्याचे तात्पर्य हे की, मैत्री हे एक लोणचं असतं. त्याला प्रेमाची बरणी आणि समजुदारपणाचे झाकण एकदा लागले की ती मैत्री मुरत जाते. त्यामध्ये व्यवहारवादाची चपढप चालत नाही. लोणच्याला जसा उष्ट्या वस्तूचा स्पर्श चालत नाही, तसं तुम्हाला या डॉक्टरसोबत मैत्री करताना हात आखडता घेऊन चालणार नाही. तरंच ती मैत्री व्यवस्थित मुरेल आणि कुठलीही आरोग्य समस्या असू द्या, तुमचा जीव वाचवण्यासाठी दत्त म्हणून हा डॉक्टर मित्र उभा ठाकेल.

डॉक्टर मित्र असा असावा, जेव्हा तुमच्या ह्रदयाचा शेवटचा ठोका पडेल तेव्हा तुमचा हात त्याच्या हातात असावा. तुमचा त्या डॉक्टर मित्रावर एवढा विश्वास असेल तर मग धर्मादाय काय, खासगी काय किंवा सरकारी काय हा प्रश्न तुमच्यासाठी असंबद्ध होऊन जाईल. म्हणून सांगतो, आजूबाजूला थोडी नजर फिरवा, मन थोडं शुद्ध आणि मोठं करा, व्यवहार थोडा बाजूला ठेवा.. एकतरी डॉक्टर मित्र नक्की सापडेल.
✍️डाॅ. सुभाष सुराणा, जेऊर, ता. करमाळा, मो.नं.8975549060

